Join us   

कोण म्हणतं शाकाहारात प्रोटीन कमी असतं? ६ भाज्या खा-मिळेल भरपूर प्रोटीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2023 3:45 PM

Protein Rich Vegetables : कोणत्या भाज्या नियमित खाल्ल्यास शरीराला प्रोटीन्स मिळतात याविषयी...

मांसाहार करणाऱ्यांमध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते आणि शाकाहार घेणाऱ्यांमध्ये प्रोटीन्सची कमतरता असते असे आपण अनेकदा ऐकतो. प्राणीज पदार्थ हे प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असतात असे मानले जाते. पण शाकाहारातही असे बरेच पदार्थ आहेत ज्यामुळे शरीराची प्रोटीनची कमतरता भरुन काढली जाऊ शकते. अंडी, मासे, मांस यातून ज्याप्रमाणे जास्त प्रमाणात प्रोटीन मिळते त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या डाळी, कडधान्ये, बिया यांतूनही शरीराची प्रोटीन्सची गरज भागवली जाऊ शकते. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती किंवा व्यायाम करणाऱ्यांनी आहारात नियमितपणे प्रोटीन्स घेणे आवश्यक असते. उत्तम आरोग्यासाठी आहारात नियमितपणे प्रोटीन्स घेणे आवश्यक असते (Protein Rich Vegetables) . 

लहान मुलांची शारीरिक, बौद्धिक वाढ चांगली व्हावी यासाठी त्यांच्या आहारात प्रोटीनचे प्रमाण जास्त असायला हवे. हाडांच्या बळकटीसाठी, स्नायूंची ताकद वाढण्यासाठी, शरीराची ताकद भरुन येण्यासाठी, प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी शरीराला प्रोटीन्सची आवश्यकता असते. बहुतांश भाज्या आणि कडधान्ये किंवा बियांमध्ये प्रोटीन चांगल्या प्रमाणात असते. त्याचा आहारात योग्य प्रमाणात समावेश केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. पाहूयात कोणत्या भाज्या नियमित खाल्ल्यास शरीराला प्रोटीन्स मिळतात. 

(Image : Google)

१. मटार 

मटार हा अनेकांच्या आवडीचा असून तो प्रोटीनचा एक उत्तम स्त्रोत असतो. मटारने गॅसेस होत असल्याने तो जास्त प्रमाणात खाऊ नये असे म्हटले जाते, मात्र मटार उकडून खाल्ल्यास ते पचनासाठी आणि प्रोटीन्ससाठी अतिशय फायदेशीर असतात. 

२. दुधी भोपळा

अनेक जण दुधी भोपळ्याला नाक मुरडतात पण भोपळा अतिशय औषधी असतो. दुधी भोपळ्यामुळे आपल्याला प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स चांगल्या प्रमाणात मिळतात. इतकेच नाही तर यामध्ये पाण्याचे आणि फायबर्सचे प्रमाणही चांगले असल्याने दुधी भोपळ्याचा आहारात नियमितपणे समावेश करायला हवा. 

३. ब्रोकोली 

ब्रोकोलीमध्येही प्रोटीन चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे ब्रोकोलीची भाजी किंवा सूप करुन आवर्जून प्यायला हवे. याशिवाय ब्रोकोलीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिनही चांगल्या प्रमाणात असतात.

(Image : Google)

४. पालक 

पालक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो हे आपण अनेकदा ऐकले आहे. पण यामध्ये प्रोटीन आणि फोलेट चांगल्या प्रमाणात असल्याने पालकाचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. याशिवाय पालकातून लोह आणि मॅग्नेशियमही चांगल्या प्रमाणात मिळते. 

५. सोयाबिन

सोयाबिन हा एक उत्तम असा शाकाहारी प्रथिनांचा स्त्रोत आहे. यातून अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन्स, खनिजे आणि फायबर मिळतात. यामध्ये आपण सोयाबिन्सची भाजी, सोयाबिन्सची उसळ, चाट, कबाब असे काही ना काही प्रकार करु शकतो. 

६. मशरुम 

मशरुम आपण फारसे खात नाही. पण कधी बाहेर गेलो तर पिझ्झा किंवा सूपमध्ये हे मशरुम वापरलेले असतात. यामध्ये प्रोटीन्स तर असतातच पण कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने मशरुम आवर्जून खायला हवेत. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना