Heart Attack : जगभरात सगळ्यात जास्त लोकांचा जीव हार्ट अटॅकमुळे जातो. आधी ही समस्या केवळ वृद्ध लोकांमध्ये होणारी समस्या म्हणून ओळखली जात होती. मात्र, आजकालची चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे कमी वयातही हार्ट अटॅकमुळे लोकांचा जीव जात आहे. नियमितपणे एक्सरसाईज न करणं, शरीराची हालचाल न करणं, जास्त स्ट्रेस यामुळेही हार्ट अटॅकच्या घटना वाढल्या आहेत. अशात बरेच लोक हृदयरोग होऊ नये आणि हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काळजी घ्यायला लागले आहेत. तुम्हालाही हा धोका टाळायचा असेल तर नाश्त्याआधी काही सोप्या सवयी लावाव्या लागतील. या सवयींमुळे हार्ट अटॅकचा धोका तर कमी होईलच सोबतच पूर्ण शरीराला फायदे मिळतील.
सकाळची वेळ ही आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची असते. सकाळी झोपेतून उठल्यावर काही हेल्दी गोष्टी केल्यास दिवसभर एनर्जी राहते आणि आरोग्यही चांगलं राहतं. या गोष्टींमुळे ब्लड प्रेशर, कोलेस्टेलॉल आणि ब्लड शुगरही कंट्रोल राहते. चला जाणून घेऊन नाश्त्याआधीच्या ५ हेल्दी सवयी.
१) २ ग्लास पाणी
सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी पाणी पिणं शरीरासाठी खूप महत्वाचं असतं. असं केल्यास शरीरात जमा झालेले विषारी तत्व बाहेर पडतील आणि ब्लड सर्कुलेशन चांगलं होईल. रोज सकाळी २ ग्लास पाणी प्यायल्यास ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं आणि हृदयाचे स्नायू मजबूत राहतात. या सवयीमुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
२) उन्हात बसा
सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्यानं शरीराला व्हिटॅमिन डी मिळतं. ज्यामुळं हाडं तर मजबूत होतातच, सोबतच आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा धोकाही कमी होतो. व्हिटॅमिन डी मुळे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत मिळते. काही रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, शरीरात व्हिटॅमिन डी कमी झाल्यास हृदयरोगांचा धोका वाढतो. तसेच इतरही अनेक समस्या होतात. त्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हात किमान १० ते १५ मिनिटं बसावं.
३) अर्धा तास फोन बघू नका
सकाळी झोपेतून उठल्या उठल्या फोन चेक करण्याची अनेकांना वाईट सवय असते. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, असं केल्यास मानसिक ताण वाढतो. दिवसाची सुरूवात डिजिटल डिटॉक्स करून केली तर तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील आणि सोबतच हृदयासाठीही फायदेशीर ठरेल. सकाळी रिलॅक्स रहा आणि काही मिनिटं ब्रीदिंग एक्सरसाईज करा. यानं स्ट्रेस हार्मोन कमी होतील आणि हृदय निरोगी राहील.
४) शरीर अॅक्टिव ठेवा
सकाळी हलकी एक्सरसाईज, योगा किंवा वॉक केल्यास हृदय निरोगी ठेवता येऊ शकतं. असं केल्यास ब्लड फ्लो वाढतो, कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते आणि हृदयाची काम करण्याची क्षमता सुधारते. रोज कमीत कमी ३० मिनिटं फिजिकल अॅक्टिविटी केल्यास हार्ट अटॅकचा धोका ३० टक्क्यांनी कमी केला जाऊ शकतो.
५) पौष्टिक नाश्ता
दिवसाची सुरूवात पौष्टिक नाश्त्यानं करणं फार महत्वाचं असतं. मोड आलेले कडधान्य, फळं, नट्स आणि प्रोटीन भरपूर असलेल्या नाश्त्यानं मेटाबॉलिज्म चांगलं राहतं. सोबतच हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. सकाळी नाश्त्यात तळलेले, भाजलेले, मसालेदार पदार्थ अजिबात खाऊ नका. यामुळे कोलेस्टेरॉल वाढेल आणि सोबतच हृदयरोगाचा धोकाही वाढेल.