Join us   

रात्री झोपताना डोक्यात विचारांचे काहूर? झोपच लागत नाही? ३ उपाय - लागेल शांत झोप...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2023 12:28 PM

How to Reduce Racing Thoughts at Night : रात्री झोपताना आपल्या मनात कोणतेही विचार येऊ नयेत यासाठी झोपण्यापूर्वी काय करावे, हे समजून घेऊयात.

रात्रीची झोप ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपल्या आरोग्यावर एकूणच आपल्या दिनचर्येवर झोपेचा खूप मोठा प्रभाव असतो. ताणतणावात राहणाऱ्या आणि कोणत्याही गोष्टीबद्दल काळजीपूर्वक तसंच खोलवर विचार करणाऱ्या व्यक्तींमध्ये झोप न येण्याचा त्रास जास्त प्रमाणात आढळतो. यामुळे त्यांच्या स्लीपिंग हार्मोनमध्ये बिघाड निर्माण होतो. परिणामी रात्रीच्या झोपेचे गणित पूर्णतः बिघडते. रात्री झोप लवकर येत नाही आणि सकाळी लवकर उठणे देखील कठीण होते. अपुऱ्या झोपेमुळे विविध गंभीर आजारांची लागण देखील होऊ शकते. अपुऱ्या झोपेमुळे डोकेदुखी, चिडचिड होणे, लक्ष विचलित होणे असे परिणाम शरीरावर दिसू लागतात. या सर्वांचे आपल्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होतात. अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकारांनाही आयते आमंत्रण मिळते. पुरेशा प्रमाणात झोप छान झाली की संपूर्ण दिवसही एकदम मस्त जातो.साधारणतः एका सामान्य व्यक्तीला किमान सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. रात्री लवकर झोप न येण्यामागे बरीच कारण असतात, रात्री झोपताना सुद्धा विचार करत राहणे हे त्यातील एक मुख्य कारण आहे. रात्री झोपताना आपल्या मनात कोणतेही विचार येऊ नयेत यासाठी झोपण्यापूर्वी काय करावे, हे समजून घेऊयात(How to Reduce Racing Thoughts at Night).

नक्की काय करता येऊ शकत? 

१. इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स वापरणं टाळा - रात्री झोपण्याच्या किमान २ तास आधी मोबाईल, लॅपटॉप, टेलिव्हीजन, कॉम्प्युटर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सचा वापर करणे टाळा. काही जण रात्री उशिरापर्यंत मोबाइल वापरत असतात. ही अतिशय वाईट सवय आहे. कारण या सवयीमुळे आपल्या झोपेवर दुष्परिणाम होत राहतात. आपल्या शरीरातील 'मेलाटोनिन' हार्मोन्स आपल्या झोपेचे चक्र नियंत्रणात ठेवत असते. या विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणातून निर्माण होणाऱ्या ब्लू रेजमुळे मेलाटोनिन हार्मोन्सचे उत्पादन रोखले जाते. परिमाणी आपल्या झोपेचे चक्र बिघडून आपल्याला वेळेवर झोप येत नाही.   

२. दैनंदिनी लिहिण्यास सुरुवात करा - रात्री झोपण्याच्या आधी दैनंदिनी लिहिण्याची सवय करा. आपल्यासोबत दिवसभरात काय घडले ?, आपण दिवसभरात काय काय केले?, किंवा आपल्या मनात जर काही विचार येत असतील तर ते विचार लिहून काढण्याचा सराव करा. असे केल्याने तुमच्या डोक्यातील विचार कागदांवर उतरतील आणि तुमच्या डोक्यात जे विचार सुरु आहेत ते थांबतील. आपल्या मनातील भावना आणि डोक्यातील विचार लिहून काढल्याने मन आणि मेंदू शांत राहतो. त्यामुळे झोपताना सतत काही विचार येत नाहीत. परिणामी चांगली झोप लागते. 

३. ध्यानधारणा करा - झोपण्यापूर्वी ध्यानधारणा करा. ध्यानधारणा केल्याने मानसिक व शारीरिक शांतता प्राप्त होते. आपल्या शरीरासाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य फायदे आहेत. स्ट्रेस, सतत डोक्यात चालू असलेला विचारांचा गदारोळ, चिडचिडेपणा, भीती, आकांक्षा-अपेक्षांचं ओझं या आणि अशा अनेक कारणांनी मेंदू सतत बिझी राहतो आणि म्हणून थकतो. नियमित ध्यान केल्याने मेंदूतील वैचारिक व भावनिक केंद्रे शांत राहतात. ध्यानधारणा करताना आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्यावर एक बिंदू धरून त्यावर लक्ष केंद्रित करा. असे केल्याने आपल्या मेंदूला चेतना मिळून आपल्याला फ्रेश वाटते. 

रात्री झोपताना आपल्या मनात कोणतेही विचार येऊ नयेत यासाठी झोपण्यापूर्वी काय करावे या टीप्स समजून घेण्यासाठी inspiredmotivator_या इंस्टाग्राम पेजवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे तो पाहूया.

टॅग्स : हेल्थ टिप्स