आपल्या शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असतो. रक्ताची निर्मिती होण्यासाठी, खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी आणि शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. म्हणूनच पाण्याला जीवन म्हटले जाते. आपल्याला तहान लागली आणि दुसरे कोणते पेय दिले तरी पाण्याची तहान ही पाण्यानेच भागते. शरीरातील सर्व अवयवांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात पाणी असणे आवश्यक असते (Tips About Drinking Water).
मात्र हे पाणी किती प्रमाणात प्यावे, कसे प्यावे याविषयी आपल्याला पुरेशी माहिती नसते. म्हणूनच प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. वरलक्ष्मी पाणी पिण्याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स आपल्याशी शेअर करतात. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्या दैनंदिन आहार-विहाराविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला देत असतात. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी असून त्यांच्या पोस्टना मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटस येत असतात. पाहूयात या पोस्टमध्ये पाण्याविषयी त्या कोणत्या गोष्टी सांगतात...
१. तहान लागेल तेव्हाच पाणी प्यायला हवे. पोटाच्या समस्या, किडनीशी निगडीत आजार यांसारख्या समस्या असतील तर जास्त पाणी पिणे योग्य नाही.
२. अन्न पचायला ज्याप्रमाणे वेळ लागतो त्याचप्रमाणे द्रव पदार्थ म्हणजेच पाणी पचायलाही वेळ लागतो. गरम पाणी लवकर पचते पण गार पाणी पचायला जड असल्याने ते लवकर पचत नाही.
३. जेवणाच्या आधी पाणी पिणे योग्य नाही, तसेच जेवण झाल्यावरही लगेच पाणी पिऊ नये. त्यापेक्षआ जेवणाच्या मध्ये मध्ये थोडे कोमट पाणी पित राहावे, त्यामुळे खाल्लेले अन्न चांगल्या रितीने पचण्यास मदत होते.
४. बसून पाणी पिणे केव्हाही चांगले. पाणी पिताना आपण बसलेले असू तर ते शरीरात चांगल्या पद्धतीने शोषले जाते.