अनेकदा आपण दिवसभर काही ना काही कामं करत असतो. वेगवेगळ्या गोष्टी करुन आपण रात्रीपर्यंत इतके थकतो की आपल्याला कधी एकदा पडतो आणि झोपतो असे झालेले असते. मात्र प्रत्यक्ष झोपल्यावर मात्र आपल्याला झोप येत नाही. आता असे का होते, तर डोक्यात सुरू असलेले विचार, जास्तीचा थकवा किंवा आरोग्याच्या तक्रारींमुळे ही समस्या उद्भवू शकते. पुरेशी झोप झाली नाही तर आपल्याला म्हणावे तितके फ्रेश वाटत नाही. पण हेच आपली छान झोप झाली असेल तर आपली दुसऱ्या दिवशीची सगळी कामे अतिशय चांगली होतात आणि आपण बराच काळ फ्रेश राहतो. व्यक्तीला किमान ७ ते ८ तासांच्या झोपेची आवश्यकता असते. ही झोप मिळाल्यास आपण फ्रेश राहू शकतो. पाहूयात पडल्या पडल्या गाढ झोप येण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात समजून घेऊया (Tips For Better Sleep)...
१. नियमित व्यायाम करा
शरीर पुरेसे थकले नाही तरी आपल्याला पडल्यावर झोप न येण्याची समस्या भेडसावू शकते. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण बौद्धिक किंवा मानसिक थकवा घेतो त्याचप्रमाणे शारीरिक थकवाही गरजेचा असतो. गाढ आणि शांत झोप लागण्यासाठी त्याची आवश्यकता असते.
२. रात्री कॅफेन किंवा अल्कोहोलपासून दूर राहा
अल्कोहोल किंवा कॅफेन झोपेपासून आपल्याला दूर करण्यास कारणीभूत ठरतात. या दोन्हीपैकी काही आपण झोपताना घेतले तर आपली झोप उडते आणि आपण रात्रभरही जागे राहू शकतो. मात्र आरोग्यासाठी ते चांगले नसते.
३. हर्बल टी
स्लीप फाऊंडेशच्या म्हणण्यानुसार तुम्हाला झोप येण्याची समस्या असेल तर हर्बल टीचा चांगला उपयोग होतो. हर्बल टी घेतल्याने शरीराचा थकवा दूर होतो आणि झोप येण्यास मदत होते.
४. मोबाईल -टीव्हीपासून दूर राहणे
अनेकदा आपण रात्री झोपताना टीव्ही किंवा मोबाईल पाहतो. या गोष्टींमुळे आपली झोप उडण्याची शक्यता असते. एकदा झालेली झोप गेली की लवकर येत नाही आणि मग आपण बराच काळ टीव्ही किंवा मोबाईल समोर बसून राहतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी या उपकरणांपासून शक्य तितके दूर राहायला हवे.