लिव्हर म्हणजेच यकृत हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. शरीरात जमा होणारी घाण आणि विषारी पदार्थ बाहेर पडण्यासाठी यकृत महत्त्वाचे कार्य करते. मात्र यकृताच्या कार्यात अडथळा निर्माण झाला तर मात्र शरीरात अनावश्यक घटक जमा होतात आणि आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. लिव्हरच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरु शकते. यकृताचा आजार कधी अनुवांशिक असतो तर कधी मद्यपान,लठ्ठपणा यांमुळेही यकृताच्या कामात बिघाड होतो. यकृत निकामी झाल्यामुळे शरीरात अशक्तपणा येणे, भूक न लागणे, उलट्या होणे, झोप न लागणे, दिवसभर थकवा जाणवणे, शरीरातील सुस्ती, वजन झपाट्याने कमी होणे, यकृताला सूज येणे ही लक्षणे दिसू लागतात. यकृताचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी काही सोपे उपाय सांगतात, ते कोणते पाहूया (Tips For Cleanse Liver Health Tips)...
१. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यातून लिंबाचे सरबत घ्या.
२. वजन कमी व्हावं आणि किडनी आणि लिव्हरचे कार्य सुरळीत चालावे यासाठी रोज ६ ते ८ ग्लास फिल्टरचे पाणी आणि २ ते ३ ग्लास गरम पाणी प्या.
३. आपल्या एकूण आहारापैकी ४० टक्के आहार हा कच्ची फळे आणि भाज्यांचा असायला हवा. याचे कारण कच्च्या गोष्टींमध्ये एन्झाईम्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनाची क्रिया तर सुलभ होतेच पण शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकण्याची लिव्हरची क्षमता वाढते.
४. रिफाईंड साखर आणि मैदा यांचा आहारात कमीत कमी समावेश करा. कारण ते पदार्थ पचायला जड असतात आणि त्यामुळे शरीरात बॅक्टेरीया वाढण्याची शक्यता असते.
५. मूग, मटकी, हरबरा यांसारख्या मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करा. त्यामुळे लिव्हर स्वच्छ होण्यास चांगली मदत होईल.
६. रोज गाजर, बीट आणि पालक यांचा किंवा गव्हांकुराचा ज्यूस घ्या. हे सगळे लिव्हर स्वच्छ होण्यास अतिशय उपयुक्त असे घटक आहेत.
७. तळलेले पदार्थ, नॉनव्हेजसारखे जड पदार्थ शक्यतो टाळा. कारण हे पदार्थ नियमितपणे खाल्ल्यास लिव्हरच्या कार्यात कालांतराने अडथळा निर्माण होण्यास सुरुवात होते.