एकदा सकाळचा नाश्ता झाला की थेट दुपारचे जेवण. ते झाले की संध्याकाळी ५ वाजताचा चहा आणि स्नॅक्स आणि मग रात्रीचे जेवण असे बहुतांश जणांचे खाण्यापिण्याचे रुटीन असते. पण या सगळ्याच्या मधल्या वेळातही काही जणांना सतत खाण्याची इच्छा होते. मग आपण ऑफीसचे काम करत असो किंवा विकेंडला घरात असू अचानक काहीतरी तोंडात टाकायची इच्छा होते. यामध्ये कधी नमकीन पदार्थांचा समावेश असतो, कधी गोड पदार्थांचा तर कधी चहा-कॉफीचा. दोन खाण्यांच्या मध्ये काहीतरी खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होणे हे सामान्य असले तरी त्यावेळी आपण काय खातो, पितो किंवा किती प्रमाणात खातो हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यासंदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. तुम्हालाही सतत असे क्रेव्हींग्ज होत असतील तर काय करायचं याबाबत त्या नेमकं काय सांगतात पाहूया (Tips for How To Prevent Cravings by Rujuta Divekar)...
१. खाण्याच्या प्रमाणाबाबत स्वत:ला सूट द्या
बहुतांश मुली डाएटींग करत असल्याने त्यांना जे आवडतं ते त्या ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यामध्ये खाऊ शकत नाहीत. कारण त्या डाएट करत असल्याने त्या आपल्या खाण्याच्या प्रमाणावर एकप्रकारचे निर्बंध घालतात. त्यामुळे मुख्य जेवणाच्या वेळी तुम्हाला जितके खावेसे वाटते तितके खात जा. ते पचवण्यासाठी काही ना काही करा.
२. भूक ही बदलत राहणारी गोष्ट असते
आपल्याला लागणारी भूक ही बदलणारी गोष्ट असते हे लक्षात ठेवा. त्यामुळे एकदा निश्चित केलेल्या प्रमाणातच आहार घ्यायचा असे करु नका. उन्हाळ्यात आपल्याला कमी भूक लागते तर थंडीत जास्त लागते. आपण एखाद्या कामात जास्त बिझी असतो आणि डोक्याला आणि शरीराला जास्त कष्ट पडतात तेव्हा जास्त भूक लागते तर कष्ट कमी होतात तेव्हा आपोआपच भूक कमी होते. तेव्हा एक छराविक प्रमाण ठरवून त्या प्रमाणातच खात राहणे योग्य नाही.
३. इतरांशी तुलना नको
आपण ज्या प्रमाणात खातो ते प्रमाण आपल्यासाठी योग्य होते की नाही हे आपल्यासोबत काम करणारे सहकारी नवरा किंवा घरातील इतर मंडळी यांना माहित नसते. तर आपल्या आहाराचे हे प्रमाण आपल्यापेक्षा जास्त चांगले कोणालाच माहित असू शकत नाही. त्यामुळे आपल्याला जितकी भूक आहे तितकं आपण नक्की खायला हवं.
याबरोबरच खाली बसून खा, शांतपणे खा तसेच आजुबाजूला स्क्रीन नसेल आणि शांतता असेल अशा वातावरणात खायला हवे. हे खाताना चुकून जास्तीचे खाल्ले गेले तरी स्वत:ला माफ करा, आपण माणूस आहोत त्यामुळे आपल्याकडून चुका होऊ शकतात हे लक्षात घ्या आणि पुढे जा. वरच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यानुसार आहार-विहाराकडे बारकाईने लक्ष दिले तर मध्ये मध्ये खायची इच्छाच होणार नाही. कारण जेव्हा खाता तेव्हा तुम्ही मनापासून तुम्हाला हवे तितके खाल्लेले असेल.