Join us   

डायबिटीस रुग्णांनी खूप गरम पाण्याने आंघोळ करणे घातक, संशोधन सांगते-असे कराल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2023 12:48 PM

Tips to Diabetes Patients about Using Hot Water For Bathing : खूप गरम पाण्यामुळे नेमक्या काय समस्या उद्भवतात याविषयी...

ठळक मुद्दे डायबिटीस असणाऱ्यांनी शक्यतो खूप गरम पाणी वापरण्याऐवजी कोमट पाण्याचा आंघोळीसाठी वापर करायला हवा. संशोधनातील निष्कर्षानुसार जास्त प्रमाणात गरम पाणी वापरणे धोकादायक

गरम पाण्याने आंघोळ करणे आपल्यासाठी अगदीच सवयीचे असते. थंडीच्या दिवसांत तर बाहेर गारठा असल्याने गार पाणी सहनच होत नाही. अशावेळी आपण आवर्जून गरम पाण्याने आंघोळ करतो. एरवी गरम पाण्याने आंघोळ करणे ठिक असले तरी डायबिटीसच्या रुग्णांना जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याचा त्रास होऊ शकतो असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार भारतात जवळपास ७ कोटीहून अधिक डायबिटीस रुग्ण आहेत, तर २.५ कोटी जण प्री डायबिटीक आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढत असताना रुग्णांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे (Tips to Diabetes Patients about Using Hot Water For Bathing). 

(Image : Google)

डायबिटीस हा हळूहळू पसरणारा आजार असून त्यामुळे भविष्यात आरोग्याची गुंतागुंत होण्याची शक्यता असते. डायबिटीसच्या रुग्णांनी जास्त प्रमाणात गरम पाण्याचा वापर केला तर तो त्यांच्यासाठी धोक्याचा असतो. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ डायबिटीस अँड डायजेस्टीव्ह अँड किडनी डिसिजच्या म्हणण्यानुसार, जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे डायबिटीसच्या रुग्णांसाठी चांगले नसते. त्यामुळे त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते. ज्यामुळे पाय कोरडे पडणे, त्वचा निघणे, जखमा होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. तसेच गरम पाणी जास्त वापरल्यास HbA1c ची लेव्हल कमी होण्याचीही शक्यता असते. 

(Image : Google)

‘सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’च्या म्हणण्यानुसार, डायबिटीसचे बरेचसे रुग्ण रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी इन्शुलिनचे इंजेक्शन घेतात. हे इंजेक्शन घेणाऱ्यांनी खूप जास्त प्रमाणात गरम पाण्याचा वापर करु नये. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गरम पाण्यामुळे रक्ताच्या नसा रिलॅक्स होतात आणि प्रसरण पावतात. ज्यामुळे इन्शुलिन शरीरात पटकन शोषले जाते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने कमी होण्याची शक्यता असते. यामुळे एकदम शुगर डाऊन झाली तर ते आरोग्यासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे डायबिटीस असणाऱ्यांनी शक्यतो खूप गरम पाणी वापरण्याऐवजी कोमट पाण्याचा आंघोळीसाठी वापर करायला हवा. त्यामुळे त्वचेच्या समस्यांपासूनही दूर राहण्यास मदत होईल. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेह