हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलावर आपले नियंत्रण नसते. उन्हाळा संपून काहीसा उशीराच पावसाळा सुरू झाला. त्यानंतर काही दिवस पावसाचा जोर काही केल्या ओसरत नव्हता. पण जसा श्रावण महिना सुरू झाला तसा ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला. एकीकडे दिवसभर उन्हाने अंगाची लाहीलाही आणि संध्याकाळी धुवाधार पाऊस यामुळे रोगट किंवा आजारी पाडणारे वातावरण निर्माण व्हायला सुरूवात झाली आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच सर्दी, ताप, खोकला अशा संसर्गजन्य आजारांची लागण व्हायला मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली आहे. एकदा घरातील एक व्यक्ती आजारी पडला की त्याच्या वासाने घरातले सगळेच आजारी पडतात. मग दवाखाने, औषधे असं सगळं सुरू होतं. हवाबदल झाला की शरीर त्या हवामानाशी जुळवून घेताना काही ना काही लक्षणे दाखवणारच. हे जरी खरे असले तरी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल आणि थोडा हवाबदल झाला तर जास्त त्रास होऊ नये असे वाटत असेल तर आपल्या जीवनशैलीत काही बदल आवर्जून करायला हवेत. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. पौर्णिमा काळे याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे सांगतात (Tips to Improve Immunity and stay healthy In season Change)...
१. व्यायामाला पर्याय नाही..(Exercise)
दिवसभराच्या धावपळीत व्यायाम करायला वेळ नाही अशी सबब आपण सगळे कायम सांगतो. हे जरी खरे असले तरी इतर गोष्टींना आपण ज्याप्रमाणे प्राधान्य देतो, त्याप्रमाणे व्यायामालाही आपण प्राधान्य द्यायला हवे. दिवसातील किमान २० मिनीटे, अर्धा तास हा कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या व्यायामासाठी आवर्जून काढायला हवा. त्यामुळे शरीर बळकट राहण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास नक्कीच मदत होते.
२. रात्रीची शांत आणि पूर्ण झोप हवी (Sleep)
रात्रीची झोप ही सूर्योदय शांत आणि पूर्ण होणे अतिशय आवश्यक असते. ऑफीसचे काम, घरातील जबाबदाऱ्या किंवा सोशल मीडियाचे व्यसन यामुळे हल्ली अनेक जण रात्री खूप उशीरा झोपतात. असे केल्याने सकाळीही लवकर जाग येत नाही आणि झोप अपूर्ण होते. पण शरीराला पुरेशी विश्रांती किंवा आराम मिळाला नाही तर आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे आणि ७ ते ८ तासांची पूर्ण झोप घेणे उत्तम आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे हे लक्षात घ्यायला हवे.
३. आहाराबाबत लक्षात ठेवा..(Diet)
आहार हा आपल्या आरोग्यातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. बदलत्या ऋतूनुसार आहारात बदल करणे आवश्यक असते. पावसाळ्याच्या दिवसांत सहज पचेल असा, ताजा, हलका आहार घ्यायला हवा. या काळात अग्नी मंद होतो तसेच त्यामुळे शिळे, डबाबंद, आंबवलेले, साठवलेले पदार्थ अजिबात खाऊ नयेत. त्यामुळे पोटाला त्रास होण्याची शक्यता असते. तसेच बाहेरचे, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळायला हवे.