झोप ही आपल्या सगळ्यांचीच जीव की प्राण. आपण खूप कामात असलो की आपल्याला प्रचंड झोप येत असते आणि दुसरीकडे जेव्हा आपल्याला सुट्टी असते किंवा आपण थोडे निवांत असतो तेव्हा आपल्याला काही केल्या झोप येत नाही. मात्र रात्रीची झोप नीट झालेली असली की पुढचा दिवस फ्रेश जातो हे नक्की (Tips to Sleep Better at Night). दुपारची छोटीशी डुलकी काढणं ऑफीस आणि इतर कामांमुळे अनेकदा आपल्यातील अनेकांना शक्य होत नाही. पण रात्री मात्र पुरेशी झोप झाली नाही की आपल्याला अस्वस्थ व्हायला होतं. रात्री किमान ७ ते ८ तासांची गाढ झोप प्रत्येकाला आवश्यक असते. यातही आपला शारीरिक आणि मानसिक थकवा किती आहे त्यानुसार त्याचे प्रमाण बदलते. पण किमान ६ तासांची झोप तरी व्यवस्थित हवीच. असे असताना अनेकदा आपल्याला मध्यरात्र झाली तरी झोप लागत नाही. इतकेच काय पण सकाळीही सवयीमुळे किंवा कामांचे विचार डोक्यात असल्याने लवकर जाग येते. आता असे झाले तर झोप पूर्ण होत नाही आणि आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवतात. झोप पूर्ण झाली नाही तर पोट साफ होण्यास अडचण येते. इतकेच काय पण फ्रेश न वाटल्याने दिवसभर अंगात एकप्रकारचा आळस राहतो. असे तुमचेही होत असेल तर रात्री लवकर झोप यावी यासाठी काही गोष्टी आवर्जून करा...
१. सतत स्क्रीनसमोर असणे
स्क्रीन ही सध्या आपल्या सगळ्यांना वेड लावणारी गोष्ट आहे. मग तो टीव्ही असो, मोबाईल असो किंवा टॅब. वेगवेगळे ओटीटी प्लॅटफॉर्म, सोशल मीडियाचे जाळे आणि इतरही अनेक गोष्टी. यांमुळे आपल्या प्रत्येकासमोर रिकामा वेळ असला की स्क्रीन असतेच. मात्र याचा आपल्या झोपेवर परिणाम होत असून झोपताना स्क्रीन पाहणे टाळा. त्यामुळे तुम्हाला वेळेत आणि गाढ झोप लागण्यास मदत होईल.
२. जेवणाच्या पद्धती
अनेकदा आपल्या जेवणाच्या पद्धतींचा आपल्या झोपेवर परिणाम होत असल्याचे काही संशोधनांतून समोर आले आहे. काही पदार्थांमुळे आपल्याला पटकन आणि गाढ झोप लागते तर रात्रीच्या वेळी काही पदार्थ आहारात घेतल्यास झोप उडते. त्यामुळे आहाराबाबत डॉक्टरांशी किंवा आहारतज्ज्ञांशी योग्य ती सल्लामसलत करावी आणि त्यानुसार रात्रीचा आहार ठरवावा.
३. झोपताना द्रव पदार्थ जास्त प्रमाणात घेणे
अनेकांना झोपताना खूप पाणी पिण्याची किंवा दूध, मिल्क शेक यांसारखे द्रव पदार्थ घेण्याची सवय असते. पण अशाप्रकारे द्रवपदार्थांचे प्रमाण झोपताना जास्त असेल तर आपल्याला वारंवार लघवीला लागू शकते. त्यामुळे झोपमोड होण्याची शक्यता असते. म्हणून रात्री झोपताना कमीत कमी द्रव पदार्थांचा आहारात समावेश ठेवावा.
४. दिवसभर डुलक्या घेणे
सध्या आपल्यातील बरेच जण अजूनही वर्क फ्रॉम होम आहेत. इतकेच नाही तर एरवीही रात्रीची झोप पूर्ण न झाल्याने आपल्यातील काही जण दिवसातून काही वेळा डुलक्या काढताना दिसतात. सकाळी नाश्ता आणि आंघोळ झाली की आपल्या डोळ्यांवर झापड येते, दुपारचे जेवण झाले की आपल्याला झोप येते. अशावेळी निग्रहाने डुलकी घेणे टाळायला हवे. त्यावेळी तुम्ही डुलकी घेतली तर तुम्हाला रात्री पडल्यावर लगेच झोप लागत नाही.
५. झोपताना मेडीटेशन करणे
अनेकदा रात्री झोपल्यावर आपल्या डोक्यात विचारांचे काहूर माजते. त्यामुळे आपल्याला झोप येत नाही. एकामागून एक सलग विचार येत राहीले तर झोप उडते. अशावेळी रात्री गादीवर पडल्यावर काही वेळ आवर्जून ध्यान करावे. यामध्ये आपण शवासन ध्यान, ध्यानाचे इतर प्रकार असे काहीही करु शकतो. त्याचा शांत झोप लागण्यास निश्चित फायदा होतो.