आपल्या सभोवती अशा अनेक व्यक्ती असतात, ज्या खूप घोरतात. कदाचित आपणही त्यांच्यातलेच एक असतो. काही लोक मंद सुरात घोरतात, तर काही लोक इतके जोरजोरात घोरतात की दुसऱ्यांना त्यांच्या आवाजामुळे झोपच लागत नाही. मग अशा व्यक्तींसोबत एका खोलीत झोपायलाही त्यांच्या जवळची मंडळी तयार होत नाहीत. आपण घोरतो, याची घोरणाऱ्या व्यक्तींना प्रचंड लाज वाटत असते. चारचौघात ते खूप जास्त ऑकवर्डही होतात. पण या सगळ्या गोष्टी झोपेत असताना त्यांच्याकडून नाईलाजाने होऊन जातात. मग त्यावर काय इलाज करायचा हेच माहिती नसतं.
बऱ्याचदा असं होतं की घोरण्याचा आवाज जितका मोठा, तितकी त्या व्यक्तीला गाढ झोप लागली आहे, असं वाटतं. वरवर पाहता घोरणं हे खूपच साधं नॉर्मल वाटत असलं तरी असं खूप मोठ्या आवाजात घोरणं तब्येतीसाठी अजिबातच चांगलं नाही. आरोग्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते, असं तज्ज्ञ सांगतात. कारण घोरण्यामुळे रक्तदाब, हार्ट अटॅक, थायरॉईड, मधुमेह असे अनेक आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे खूपच जास्त घोरत असाल, तर वेळीच सावध व्हा आणि आरोग्याची काळजी घ्या.
घोरणं म्हणजे नेमकं काय?
एखादी व्यक्ती घोरते म्हणजे ती व्यक्ती झोपेत असताना त्या व्यक्तीच्या नाका, तोंडावाटे जोरात वारंवार आवाज येतो. झोपेत हवेच्या हालचालीत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे असा आवाज यायला सुरूवात होते. घसा आणि नाकामध्ये जास्त टिश्यू असल्यास कंपनं निर्माण होतात. त्यामुळे घोरल्या जाते. शिवाय प्रत्येकाचे घोरण्याचे आवाज आणि पद्धती वेगवेगळ्या असतात. हे कधीकधी फारच गंमतशीर आणि हास्यास्पद वाटते.
घोरण्याची कारणे
- लठ्ठपणा हे घोरण्याचे एक प्रमुख कारण आहे.
- झोपेत घशाचे स्नायू सैल होतात आणि त्यातून हवेचा मार्ग बंद पडतो. त्यामुळे व्यक्ती घोरायला लागते.
- पोटाच्या आणि छातीच्या मध्ये असलेल्या पडद्याची व्यवस्थित हालचाल झाली नाही, तरी माणूस घोरायला लागतो.
घोरल्यामुळे निर्माण होतात हे आजार
घाेरणाऱ्या व्यक्तीचा रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. व्यक्तीला मधुमेहही असू शकतो. घोरताना हृदयाचे ठोके वेडेवाकडे पडून झोपेतच ॲटॅक येण्याची भीती असते. पॅरालिसीस होऊ शकतो. त्याचबरोबर घोरण्याच्या सवयीमुळे व्यक्तीला थायरॉईडचा आजार असण्याची शक्यता वाढते. घोरण्यामुळे अपूरी झोप, दिवसभर सुस्त होणे, एकाग्रता कमी होणे, काम करण्याची इच्छा कमी होणे असेही परिणाम जाणवतात.
तज्ज्ञ सांगतात....
१. उपचार करून घेता येतात
स्थूलपणामुळे घोरण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. घोरण्यामुळे रात्री झोप होत नाही. म्हणून त्या व्यक्तीला दिवसा झोप येण्याचा त्रास होतो. ही समस्या कमी होण्यासाठी वेळीच निदान करून उपचार घेतला पाहिजे. या समस्येमुळे अनेक रूग्ण उपचारासाठी येतात. काही तपासण्या करून घोरण्यासंदर्भात औषधोपचार, शस्त्रक्रिया करता येतात. असे डॉ. प्रभाकर जिरवणकर यांनी सांगितले.
२. थोडे घोरणे ठीक... पण
व्यक्ती जर थोडेफार घोरत असेल तर सामान्य बाब म्हणता येईल. परंतु आजूबाजूच्या इतरांना जर घोरण्याचा त्रास होत असेल, तर तेव्हा ते घोरणाऱ्या व्यक्तीला हानिकारक असते. झोपले होते, पण उठलेच नाही, झोपेतच मृत्यू झाला, असे आपण बऱ्याचदा ऐकतो. घोरताना हृदयाचे ठोके वेडेवाकडे पडून ॲटॅक येऊ शकताे. त्यामुळे घोरण्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे, असे डॉ. अनंत कुलकर्णी यांनी सांगितले.