Join us   

खूप थकल्यासारखं वाटतं, अंगात ताकद नाही, काहीच करावंसं वाटत नाही? ३ पदार्थ खा, मिळेल लगेच एनर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2023 9:45 AM

Top 3 Foods for Tiredness and Lethargy : प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर सांगतात...

 वातावरणातील बदलामुळे, प्रमाणापेक्षा जास्त शारीरिक श्रम केल्याने आपल्याला थकवा येतो. इतकेच नाही तर ऑफीसच्या कामाचे किंवा इतरही कोणते प्रेशर असल्याने नाहीतर शरीरात कोणत्या गोष्टींची कमतरता असल्याने आपल्याला हा थकवा आलेला असतो. अशावेळी आपल्याला काहीच न करता फक्त झोपून किंवा बसून राहावेसे वाटते. हा आळस किंवा थकवा कमी व्हावा यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे महत्त्वाचे असते. सकारात्मक मानसिकता, उत्तम सकस आहार, पुरेशी झोप आणि व्यायाम या गोष्टींमुळे हा थकवा कमी होऊ शकतो. त्याचबरोबर आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. हे पदार्थ कोणते आणि त्यामुळे शरीराला कोणते घटक मिळतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देतात पाहूया (Top 3 Foods for Tiredness and Lethargy)... 

१. अळीव

अळीव हा अतिशय पारंपरिक पदार्थ असून आपल्याकडे पूर्वीपासून ताकद भरुन येण्यासाठी अळीवाचे लाडू, खीर करण्याची पद्धत आहे. मधल्या वेळेत खाण्यासाठी नारळ आणि गूळ घातलेले हे लाडू अतिशय उत्तम पर्याय असतात. तसेच झोपताना अळीव आणि दूध किंवा अळीवाची खीर खाणे फायदेशीर ठरते. अळीवामध्ये फोलेट चांगल्या प्रमाणात असते त्यामुळे हिमोग्लोबिन आणि लोह वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीराला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होण्यास मदत होते. 

(Image : Google)

२. मोड आलेली कडधान्ये

आपण भाज्या संपल्या तरच कडधान्ये भिजवतो आणि उसळ करतो. मात्र आठवड्यातून किमान ४ ते ५ वेळा तरी उसळीचा आहारात समावेश असायला हवा. शरीरात मिनरल्स म्हणजेच खनिजांची कमतरता असेल तरी आपल्याला थकवा येऊ शकतो. या कडधान्यातून भरपूर प्रमाणात ताकद मिळत असल्याने मोड आलेली कडधान्ये आवर्जून योग्य त्या प्रमाणात खायला हवीत. नाश्त्याला, जेवणात किंवा अगदी २ जेवणांच्या मधे ५ वाजताही आपण या उसळी खाऊ शकतो.  

३. काजू

अनेकदा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा ताण असल्यानेही आपल्याला थकवा आल्यासारखे किंवा लो एनर्जी असल्यासारखे वाटते. हा ताण किंवा थकवा कमी होण्यासाठी मूठभर काजू खाल्लेले केव्हाही चांगले. मधल्या वेळात आपण नुसते काजू खाऊ शकतो किंवा रात्री झोपताना दूधासोबत काजू खावेत. काजू खाल्ल्याने गुड कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे हृदयाचे कार्य चांगले राहण्यास मदत होते. काजूमध्ये मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असल्याने नसांना आलेला थकवा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे लो वाटत असेल तेव्हा आणि एरवीही आवर्जून काजू खायला हवे.     

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलआहार योजना