शरीराचे योग्य पोषण व्हावे यासाठी आपल्याला प्रोटीन, जीवनसत्त्वे, खनिजे, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके अशा सगळ्या घटकांची योग्य प्रमाणात आवश्यकता असते. हे सगळे घटक मिळाले तरच आपले शरीर सुदृढ राहू शकते. प्राणीज पदार्थांतून आपल्याला सर्वात जास्त प्रोटीन मिळते असे मानले जाते. हे जरी खरे असले तरी शाकाहारी पदार्थांतूनही आपल्याला पुरेशा प्रमाणात प्रोटीन मिळू शकते. विविध प्रकारच्या डाळी, कडधान्ये, बिया यांतूनही शरीराची प्रोटीन्सची गरज भागवली जाऊ शकते. याशिवाय धान्यांतही प्रोटीनचे प्रमाण चांगले असते. हाडांच्या बळकटीसाठी, स्नायूंची ताकद वाढण्यासाठी, शरीराची ताकद भरुन येण्यासाठी, प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी शरीराला प्रोटीन्सची आवश्यकता असते (Top 5 Indian Grains which are high in protein).
प्रोटीन हा असा गटक आहे ज्याची शरीरात निर्मिती होऊ शकत नाही, त्यामुळे तो बाहेरुन घेण्याशिवाय पर्याय नसतो. धान्य हा आपल्या आहारातील मुख्य घटक असल्याने प्रोटीन आणि फायबर जास्त असेल आणि ग्लुटेन फ्री असतील अशी धान्ये कोणती ते आज आपण पाहणार आहोत. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती किंवा व्यायाम करणाऱ्यांनी आहारात नियमितपणे प्रोटीन्स घेणे आवश्यक असते. लहान मुलांची शारीरिक, बौद्धिक वाढ चांगली व्हावी यासाठी त्यांच्या आहारात प्रोटीनचे प्रमाण जास्त असायला हवे.
१. बकव्हीट म्हणजेच कुट्टू
हे भारतात मिळणारे पण अतिशय कमी प्रमाणात खाल्ले जाणारे धान्य आहे. हे एकप्रकारचे सीड आहे. ज्याचे पीठ करुन त्याचा आहारात विविध पदार्थांत समावेश करता येतो.
२. राजगिरा
प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असलेल्या राजगिऱ्यामध्ये फायबर, आयर्न, कॅल्शियम असे आरोग्यासाठी उपयुक्त असलेले बरेच घटक असतात. म्हणूनच उपवासाला आपल्याकडे आवर्जून राजगिरा खाल्ला जातो. राजगिऱ्याची खीर, लाडू, पिठाचे थालिपीठ असे बरेच पदार्थ करता येतात.
३. नाचणी
नाचणी हा भारतात पिकणारे अतिशय उत्तम असे धान्य आहे. नाचणीमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि लोह अतिशय चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळेच नाचणीचे लाडू, नाचणीचे आंबील, भाकरी असे पदार्थ आवर्जून खाण्यास सांगितले जातात.
४. कंगणी
हे एकप्रकारचे तृणधान्य असून बाजरी किंवा नाचणीप्रमाणे आपण याचा आहारात समावेश करुन शकतो. भात किंवा दलिया करतो त्याचप्रमाणे याची खिचडी करता येऊ शकते.
५. ब्राऊन राईस
नेहमीच्या पांढऱ्या तांदळामध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी असते पण ब्राऊन राईसमध्ये प्रोटीन चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे आपण नियमितपणे आहारात ब्राऊन राईसचा समावेश करु शकतो. ब्राऊन राईस इतर दृष्टीनेही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो त्यामुळे तो अवश्य खायला हवा.