जगभरात सध्या कोट्यवधी लोक मूत्रपिंडाच्या विविध प्रकारच्या आजारांनी त्रस्त आहेत. किडनीचे काम सुरळीत चालणे आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर काढण्यासाठी फिल्टरप्रमाणे किडनी काम करत असते. पण किडनीच्या कार्यात अडथळा आला तर हे घटक शरीराबाहेर पडत नाहीत आणि विविध प्रकारच्या गंभीर समस्या निर्माण होतात. शरीरातील कोणत्याही अवयवावर ताण आला तर त्याचा परिणाम इतर अवयवांवर होतो आणि आपली तब्येत ढासळत जाते (5 Lifestyle Habits That Are Hurting Your Kidneys).
किडनीचे दुखणे वेळच लक्षात न आल्याने डायलिसिस करावे लागणारे हजारो रुग्ण सध्या आपल्याला आजुबाजूला दिसतात. आपल्या जीवनशैलीतील काही सवयी किडनीसाठी घातक असतात. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी निकामी झाल्याचा कौटुंबिक इतिहास असेल किंवा ६० वर्षांहून अधिक वयामुळे किडनीच्या आजाराचा धोका असेल तर, किडनीच्या आजारासाठी दरवर्षी चाचणी करणे महत्त्वाचे आहे. तसेच आपल्या रोजच्या सवयींमध्येही काही प्रमाणात बदल केल्यास किडनीचे आणि पर्यायाने शरीराचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. किडनीचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी कोणत्या सवयी बदलायला हव्यात याविषयी...
१. पेनकीलरचा अतिवापर
आपले थोडे डोके दुखले किंवा पित्त झाले, पोट खराब झाले की आपण मेडीकलमध्ये जातो आणि गोळ्या घेऊन त्या खातो. यामुळे समस्या तात्पुरती नियंत्रणात येण्यासाठी येते, पण दिर्घकाळ अशाप्रकारची औषधे घेणे किडनीच्या आरोग्यासाठी घातक असते. सतत डोकेदुखी, पोटदुखी, अंगदुखी किंवा पित्तासाठी गोळ्या घेतल्यास त्याचा किडनीवर थेट परिणाम होतो आणि किडनी खराब होऊन अखेर तिचे काम थांबू शकते.
२. पाणी कमी पिणे
शरीरातील अन्न घुसळून चांगल्या अन्नाचे रक्तात रुपांतर करणे आणि शरीराला आवश्यक नसणारे घटक बाहेर टाकणे हे महत्त्वाचे काम किडनीच्या माध्यमातून केले जाते. या सगळ्या क्रियेसाठी शरीराला पाण्याची जास्तीत जास्त आवश्यकता असते. पण योग्य त्या प्रमाणात पाणी प्यायले नाही तर किडनीच्या कामात अडथळा येतो. त्यामुळे दिवसभरात १० ते १२ ग्लास पाणी प्यायला हवे.
३. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे
प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण खूप जास्त असते. तसेच या पदार्थांमध्ये सोडीयम, फॉस्फरस यांचे प्रमाणही जास्त असते. शरीरात या घटकांचे प्रमाण जास्त झाल्यास किडनीच्या कार्यात अडथळा येतो. त्यामुळे बाहेरचे प्रक्रिय केलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरात केलेले पदार्थ खायला हवेत.
४. व्हिटॅमिनची कमतरता असलेला आहार
आपल्या शरीरासाठी आणि विशेषत: किडनीच्या कामासाठी काही व्हिटॅमिन्स अतिशय उत्तम काम करत असतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमी बी ६ यांचा समावेश होतो. पण हे व्हिटॅमिन्स शरीराला योग्य प्रमाणात मिळाले नाहीत तर मात्र किडनी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे किडनीचे कार्य सुरळीत व्हायचे असेल तर आहारात सर्व गोष्टींचा योग्य प्रमाणात समावेश असायला हवा.
५. अल्कोहोलचे अतिसेवन
अनेकांना नियमितपणे अल्कोहोल घेतल्याशिवाय झोप लागत नाही. मात्र अल्कोहोलच्या अतिसेवनाचा किडनीवर विपरित परिणाम होतो. एका अभ्यासानुसार नियमितपणे अल्कोहोलचे सेवन करणाऱ्यांच्या किडनीचे काम हळूहळू कमी होत जाते आणि किडनी निकामी होतात. त्यामुळे हे व्यसन वेळीच सोडलेले बरे.