डॉ. दाक्षायणी पंडित
सुभद्रा शितोळे पहिल्या बाळंतपणासाठी थेट माहेरच्या गावी प्राथमिक आरोग्य केंद्रात आली. डॉक्टरांनी तिला काही प्रश्न विचारले तेव्हा त्यांना धक्कादायक गोष्टी कळल्या. त्या म्हणजे तिचा जन्म एका दुर्गम भागातल्या वस्तीवर झाला होता. तिथे कुठलाही रस्ता तसेच दुकान, दवाखाना अशा सामान्य सोयीही नव्हत्या. सुभद्राची गर्भारपणात एकही वैद्यकीय तपासणी झाली नव्हती. तिचे प्राथमिक लसीकरणही झालेले नव्हते. डॉ. साबळेंना हे सर्व ऐकल्यावर एकूण धोक्याची कल्पना आली. त्यांनी तिच्या आवश्यक त्या तपासण्या करून घेतल्या. तिचे हिमोग्लोबिन चांगले होते, ५-६ तासांनी सुभद्रा बाळंत झाली. छान गुटगुटीत मुलगा झाला. चार दिवस दवाखान्यात राहून सुभद्रा आईकडे राहायला गेली. ४-५ दिवसांनी सांगितल्याप्रमाणे ती बाळाला घेऊन आली (TT Injection Tetanus Vaccination Importance for Women).
तिची बाळाबद्दल तक्रार होती की दोन दिवसांपासून बाळ दूध नीट पीत नव्हते. डॉ. साबळेंना चिंता वाटायला लागली. त्यांनी बाळाला तपासलं तर बाळाचे ओठ घट्ट आवळलेले होते. बाळाला ते उघडता येत नव्हते. म्हणून त्यांनी बाळाची नाळ पहिली तर तिथे जंतुसंसर्गाची चिन्हे होती. एकूण लक्षणे धनुर्वाताकडे बोट दाखवीत होती. बाळाचे आयुष्य धोक्यात होते. डॉ. नी सुभद्राला व सोबत आलेल्या तिच्या आईला परिस्थितीची कल्पना देऊन दवाखान्यात दाखल व्हायला सांगितले, पण त्या घरी निघून गेल्या. दोनच दिवसांनी सुभद्राचं बाळ गेल्याची दु:खद बातमी आली.
एव्हढं काय झालं की सुभद्राचं बाळ गेलं? आपल्याकडे ग्रामीण भागात बाळाच्या नाळेवर गोवरीची राख लावण्याचा प्रघात आहे. गोवारीच्या राखेत धनुर्वाताचे जंतू असतात. ज्या बाळाला आईकडून तिच्या रक्तातील धनुर्वातरोधी प्रतिपिंडे मिळतात त्या बाळांना धनुर्वात होत नाही. पण आईच्या रक्तात प्रतिपिंडे कुठून येतात तर लसीकरणातून. सुभद्राचे कोणतेच लसीकरण झाले नसल्याने तिच्याच रक्तात प्रतिपिंडे नव्हती तर बाळात कुठून येणार? म्हणून महिलांचे धनुर्वात लसीकरण महत्वाचे. हे दोन वेळा करावे लागते.
१. अर्भकांचे प्राथमिक लसीकरण होते तेव्हा म्हणजे जन्मानंतर ४थ्या, ८व्या आणि १२व्या आठवड्यात ; नंतर पहिली वर्धक मात्रा दुसऱ्या वर्षी वा दुसरी वर्धक मात्रा ५व्या वर्षी. इथे तीन लसी एकत्रितपणे दिल्या जातात. लसीचे नाव- डीपीटी
२. गर्भारपणात लवकरात लवकर - पहिली मात्रा; पहिल्या मात्रेनंतर ४ आठवड्यांनी दुसरी मात्रा. या वेळी एकटी धनुर्वाताचीच लस देतात. लसीचे नाव- टी.टी (टिटॅनस टॉक्साईड)
३. जर गर्भारपणाच्या आधीच्या तीन वर्षात धनुर्वाताची लस घेतली असेल तर फक्त एक वर्धक मात्रा पुरते. या मात्रांमुळे गरोदर महिलेच्या रक्तात प्रतिपिंडे तयार होतात व नाळेद्वारे ती बाळाला पोचवली जातात. यामुळे बाळाचे या घातक रोगापासून संरक्षण होते. मैत्रिणींनो, स्त्री अर्भकाचे व नंतर गर्भवती स्त्रीचे धनुर्वात लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. ते टाळू नका, कारण त्यात थेट तुमच्या बाळाच्या जिवालाच धोका आहे.
(लोखिका एम बी बी एस, एम डी. असून डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व चिकित्सा प्रयोगशाळेच्या प्रमुख निवृत्त प्राध्यापिका आहेत. )