तळलेले पदार्थ खाणे आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. म्हणून हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. कधी पापड-कुरडई, भजी, वडे, सामोसा, पुऱ्या असे काही ना काही आपण तळलेले खात असतो. बाहेर खाण्यापेक्षा घरी खाणे चांगले म्हणून आपण हे पदार्थ घरी करतो. मात्र तळलेले जास्त खाणे चांगले नाही आणि त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची आणि हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता असते असे वारंवार सांगितले जाते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पदार्थ तळताना आपल्याकडून नकळत काही चुका होतात.
या चुका वेळीच लक्षात घेतल्या तर तळकट खाल्ल्याचा त्रास होणार नाही आणि तळलेले खाल्ल्याचा आनंदही घेता येईल. यासाठी तळताना कोणतं तेल वापरावं किंवा तळताना नेमकं काय लक्षात घ्यायचं याविषयी डॉ. वरलक्ष्मी २ महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर अशा काही टिप्स लक्षात घेऊन त्यानुसार आपल्या आहाराचे नियोजन करणे आवश्यक असते. पाहूयात या २ टिप्स कोणत्या...
१. कढई किंवा तेल तापवण्याचे प्रमाण
एखादा पदार्थ तळण्यासाठी आपण कढई किंवा तेल किती प्रमाणात तापवतो हे लक्षात घेणे गरजेचे असते. यालाच इंग्रजीमध्ये स्मोक पॉईंट असे म्हणतात. स्निग्ध पदार्थ जास्त हिटवर तळू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की सगळेच स्निग्ध पदार्थ जास्त उष्णतेवर तळायला हवेत. पदार्थाचे स्वरुप, आकार यांचा अंदाज घेऊन कढईची आणि तेलाची उष्णता आपण ठरवायला हवी.
२. तेलाची निवड
तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रक्रिया होते. त्याच तेलात तळलेले पदार्थ आपण खाल्ल्यावर त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. त्यामुळे तेलाची निवड करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. तूप, खोबरेल तेल आणि एक्स्ट्रा व्हर्जिन ऑईल हे तळण्यासाठी अतिशय उत्तम मानले जाणारे पदार्थ आहेत. याशिवाय सूर्यफूल, कॅनोला, सोयाबिन आणि इतर सर्व तेलांचे तळताना ऑक्सिडायजेशन होते आणि त्यातील हानिकारक रसायने आरोग्यासाठी घातक ठरतात.