मागच्यावर्षी या काळात कोरोनाचे थैमान सुरु होते. यंदा कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, ही आपल्या सगळ्यांसाठी एक समाधानकारक गोष्ट असली तरी काही गोष्टींची चिंता मात्र वाढते आहे. डेंग्यू, चिकनगुनिया आणि त्यासोबतच टायफॉईड या आजारांनी सध्या डोके वर काढले आहे. यात विशेषत: टायफॉईडने चिंता वाढविली आहे. त्यामुळे या आजारापासून स्वत:ला आणि आपल्या कुटूंबाला सुरक्षित ठेवायचे असेल, तर काही गोष्टींची काळजी नक्कीच घेतली पाहिजे.
कसा पसरतो टायफॉईड? हा आजार कोणत्याही व्हायरसमुळे पसरत नाही. तसेच हा संसर्गजन्य आजारही नाही. दुषित पाणी आणि दुषित अन्न या गोष्टी प्रामुख्याने टायफॉईड होण्यासाठी जबाबदार आहेत. त्यामुळे बाहेरचे पदार्थ खाणे टाळले तर पाहिजेच, पण त्यासोबतच घरातही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कारण आपल्या घरातही अशा काही गोष्टी घडू शकतात, ज्यातून टायफॉईडचा धोका संभवू शकतो. त्यामुळे काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्या.
काय आहेत टायफॉईडची लक्षणे? खूप ताप येणे हे टायफॉईडचं सगळ्यात मुख्य लक्षण आहे. त्यासोबतच या आजारात उलटी, मळमळ, पोट दुखणे, अंग दुखणे, खूप जास्त अशक्तपणा येणे, भूक न लागणे, जुलाब होणे, डोके दुखणे असा त्रासही जाणवतो. अशीच लक्षणे इतर व्हायरल संसर्गातही दिसून येतात. त्यामुळे ताप आला तर अजिबात अंगावर काढू नका. तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा आणि लवकरच विविध तपासण्या करून उपचार सुरु करा.
टायफॉईड होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ? १. घर स्वच्छ ठेवा घर स्वच्छ ठेवणे, घरातले अन्नपदार्थ आणि पाणी झाकून ठेवणे खूप गरजेचे आहे. जर खाद्यपदार्थांवर झाकण ठेवले नसेल, तर त्यातूनही संसर्ग होऊ शकतो. या गोष्टीची काळजी घरातील प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि घर स्वच्छ ठेवण्यात योगदान दिले पाहिजे.
२. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा पावसाळ्याच्या दिवसात खूप जास्त चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. विशेषत: रस्त्यावर मिळणारे पदार्थ तर या दिवसात खूपच खावेसे वाटतात. पण सध्या तुमच्या या खवय्येगिरीवर नियंत्रण ठेवा आणि उघड्यावरचे, रस्त्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळा. एकूणच काय तर सध्या हॉटेलिंग एकदम कमी करून टाका.
३. फ्रिज स्वच्छ करा फ्रिज म्हणजे घरातली अशी जागा त्यात सगळे खाद्य पदार्थ अगदी कोंबून कोंबून ठेवले जातात. अनेकदा जे पदार्थ मागच्या बाजूला जातात, ते तर कधी- कधी पंधरा दिवसांनी किंवा काही घरात तर महिना भराने बाहेर निघतात. त्यामुळे कोणत्याही अनावश्यक गोष्टी फ्रिजमध्ये ठेवू नका. आठवड्यातून एकदा फ्रिजची स्वच्छता जरूर करा.
४. स्वच्छ पाणी प्या आपण जाणतोच की दुषित पाण्यातून किंवा दुषत अन्नातून टायफॉईड पसरतो. त्यामुळे स्वच्छ पाणी आणि स्वच्छ अन्न खाण्याकडे आपला कल असला पाहिजे. अनेक जण कित्येक दिवस टाकीत साठवलेले पाणी पितात. हे पाणी खरोखरंच चांगले आहे का, टाकीत काही जीवजंतू तर नाहीत ना, याची एकदा तपासणी करा आणि मगच ते पाणी प्या. नाहीतर पाणी उकळून पिणे हा सर्वोत्तम उपाय करा.