Join us   

वटपौर्णिमा स्पेशल: उपवास तर करताय पण ॲसिडीटी होऊ नये म्हणून करा ४ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2023 3:31 PM

Upwas Fasting Vatpornima Diet Tips : उपवास करताना आहाराबाबत कोणती काळजी घ्यायची याविषयी...

उन्हाळा संपून पावसाळ्याची चाहूल लागत असताना येणारा पहिला सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी महिला वर्ग मोठ्या उत्साहात वडाच्या झाडाची पूजा करत आणि एकमेकींना वाण देतात. पतीला दिर्घायुष्य मिळावे म्हणून वडाला प्रदक्षिणा मारुन महिला सावित्रीचे हे व्रत मोठ्या भक्तीभावाने करतात. वडाच्या पूजेबरोबरच या दिवशी उपवास करण्याचीही रीत आहे. मात्र एकीकडे कडक ऊन आणि दुसरीकडे पावसाळी हवा अशा वातावरणात उपवास केला तर काहींना अॅसिडीटी होण्याची शक्यता असते. एकदा अॅसिडीटी झाली की डोकेदुखी, मळमळ, छातीत जळजळणे अशा समस्या सुरू होतात. उपवासाला खाल्ले जाणारे तळकट पदार्थ, साबुदाणा, बटाटा, दाण्याचे पदार्थ यांमुळे हा त्रास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवास करताना आहाराबाबत कोणती काळजी घ्यायची याविषयी (Upwas Fasting Vatpornima Diet Tips)...

(Image : Google)

१. साबुदाणा खाताना...

साबुदाणा हा आवडीचा आणि पोटभरीचा असला तरी साबुदाण्यातून शरीराला विशेष पोषण मिळत नाही. साबुदाणा योग्य प्रमाणातच खायला हवा, शक्यतो टाळला तर जास्त चांगले. खिचडी करताना त्यामध्ये बटाटा घालावा, म्हणजे साबुदाणा कमी खाल्ला जातो. तसेच त्यासोबत काकडी, दही घ्यावे म्हणजे पोषण मिळते. 

२. द्रव पदार्थ

 या काळात डीहायड्रेशन होऊ नये म्हणून काळजी घ्यायला हवी. यासाठी आहारात ताक, नारळ पाणी, सरबतं, दूध घ्यायला हवे.  उपवासाच्या दिवशी एनर्जी वाटावी यासाठी चहा किंवा कॉफी घेण्याचे प्रमाण वाढू शकते. मात्र जास्त प्रमाणात चहा-कॉफी घेतल्यास अॅसिडीटी होण्याची शक्यता असते. अशावेळी हे ताकद देणारे द्रव पदार्थ घ्यायला हवेत. 

(Image : Google)

३. ताकद टिकवून ठेवणारे पदार्थ 

उपवासाच्या दिवशी शरीरातील ताकद टिकून राहावी यासाठी खजूर, राजगिरा वडी, सुकामेवा, दाण्याचे लाडू किंवा चिक्की अशा गोड पदार्थांचा योग्य त्या प्रमाणात आहारात आवर्जून समावेश ठेवावा. यामुळे पटकन एनर्जी मिळायला मदत होते आणि हे सगळे पौष्टीक असल्याने आरोग्याला त्याचा काही त्रास होत नाही. 

४. फळे खाताना लक्षात ठेवा...

फळं ही आरोग्यासाठी केव्हाही चांगली असं म्हणत असताना ऊन्हाळा आणि पावसाच्या तोंडावर शरीरातील अग्नी मंद झालेला असतो. त्यामुळे खूप दिवस ठेवलेली, जास्त पिकलेली फळे खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. तसेच बराच वेळ चिरुन ठेवलेली फळे खाणेही चांगले नाही. या काळात संत्री, मोसंबी, पेर, सफरचंद, आंबा, खरबूज, कलिंगड अशी ताजी फळे योग्य त्या प्रमाणात खायला हरकत नाही. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न