Join us   

व्हजायनल हेल्थ: संकोच म्हणून नाजूक जागेकडे करताय दुर्लक्ष, आरोग्यासाठी 10 गोष्टी सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 2:57 PM

शरीराच्या या नाजूक भागाची काळजी घ्यायला हवी...बोलणे टाळून उपयोग नाही

ठळक मुद्दे या भागाची स्वच्छता, अंतर्वस्राचे कापड, मासिक पाळी दरम्यान आणि शारीरिक संबंधांबाबत घ्यायची काळजी याबाबत चर्चा व्हायला हवी.सर्व वयोगटातील स्त्रियांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण होणे आवश्यक

व्हजायना (Vagina) हा काय ओपनली बोलायचा विषय आहे का, असे म्हणत आपण याबाबत बोलणे टाळतो. पण या नाजूक भागाची काळजी घेणे उत्तम आरोग्यासाठी गरजेचे असते. व्हजायन हेल्थ हा एक महत्त्वाचा विषय असून त्याबाबत योग्य ते ज्ञान प्रत्येकीला असायला हवे. या भागाची स्वच्छता, अंतर्वस्राचे कापड, मासिक पाळी दरम्यान आणि शारीरिक संबंधांबाबत घ्यायची काळजी याबाबत चर्चा व्हायला हवी. त्यामुळेच सर्व वयोगटातील स्त्रियांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण होईल आणि महिलांच्या नाजूक भागाशी निगडित कित्येक समस्या दूर व्हायला यामुळे मदत होऊ शकेल. पाहूयात व्हजायनाची काळजी घेण्याच्या काही सोप्या टिप्स...

१. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पॅंटी वापरण्यासंदर्भात विशेष काळजी घ्यायला हवी. पँटी कॉटन कापडाचीच असायला हवी, त्यामुळे या भागातील हवा खेळती राहण्यास मदत होते. इतर कापडांनी या भागातील त्वचेला इन्फेक्शन्स व्हायचे त्रास असतात.

२. व्हजायनाच्या आजुबाजूला असणारे केस वेळोवेळी ट्रीम करणे गरजेचे आहे. याठिकाणची स्कीन अतिशय नाजूक असते, त्यामुळे त्या स्कीनला काही बाधा होईल असे करु नका. पण केस जास्त वाढले तर घाम येणे, रॅशेस येणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे केस ट्रीम करणे आवश्यक आहे. 

३. तुम्हाला या भागातील केसांचे शेव्हींग करायचेच असेल तर ज्या बाजुने केसांची वाढ होत आहे, त्याबाजुने शेव्हींग करणे गरजेचे आहे. तुम्ही उलट्या दिशेने शेव्हींग केले तर स्कीनला इरीटेशन होण्याची शक्यता असते. पण नियमित शेव्हींग करणे फारसे चांगले नाही. शेव्हींगमुळे केसांची वाढ होताना टोचू शकते.

४. या भागाचे व्हॅक्सिंग करावे का असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. एखादेवेळी व्हॅक्सिंग करणे ठिक असले तरीही नियमित व्हॅक्सिंग करणे चांगले नाही. कारण याठिकाणची त्वचा नाजूक असल्याने गरम व्हॅक्समुळे किंवा व्हॅक्सिंगच्या स्ट्रीप्समुळे या भागाला इजा होऊ शकते. 

५. अनेक जणी व्हजायना स्वच्छ व्हावी यासाठी इंटीमेट वॉश घेतात. यामध्ये असणारे केमिकल व्हजायनाचा बाहेरचा भाग स्वच्छ होण्यासाठी उपयुक्त असले तरी ते व्हजायनाच्या आत गेल्यास त्याचा त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे अशाप्रकारे कोणताही उपाय करण्याआधी योग्य ती काळजी घ्यायला हवी. हा भाग स्वत:हून स्वच्छ होत असल्याने तुम्ही साबणाचे पाणी किंवा फक्त पाण्यानेही हा भाग स्वच्छ करु शकता. 

६. व्हाइट डिसचार्ज हा एकदम सामान्य असला तरीही तुम्हाला त्यामुळे अस्वच्छ वाटत असेल किंवा पँटी ओलसर राहते असे होत असेल तर तुम्ही पँटी लायनर वापरु शकता. सध्या कॉटन किंवा अनेक बायोडिग्रेडेबल पँटी लायनर बाजारात सहज उपलब्ध असतात. पण हे रोजच्या रोज वापरु नका कारण त्यामुळे तुम्हाला या भागात पुरेशी हवा मिळत नाही. 

७. याठिकाणची त्वचा थोडी काळसर आहे किंवा त्याठिकाणी मांडीला डाग आहेत म्हणून काही मुली किंवा महिला वेगवेगळ्या स्क्रबने हा भाग घासतात. पण असे करणे येथील त्वचेसाठी अजिबात फायद्याचे नसते. त्यामुळे या त्वचेला जास्त त्रास होऊ शकतो. तर हळूवार चॉवेलने पुसून ही त्वचा साफ करायला हवी.

८. अनेकदा आपण बाथरुम झाल्यावर हा भाग धुतो आणि पुसतो. त्यावेळी आधी पुढचा भाग पुसायला हवा. मग मागेपर्यंत पुसावे. कारण संडासच्या भागाला आधी पुसले आणि नंतर आपण व्हजायना स्वच्छ केली तर त्याठिकाणचे विषाणू आपल्या व्हजायनापाशी लागू शकतात आणि त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. 

९. ठराविक कालावधीने कॅन्सरची तपासणी करायला हवी. सध्या विविध कारणांमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले असून गर्भाशय किंवा इतर कॅन्सर होण्याची शक्यता असल्याने ठराविक कालावधीने चाचणी करायला हवी. 

१०. मासिक पाळीच्या काळात या भागाची विशेष स्वच्छता ठेऊन काळजी घ्यायला हवी. ठराविक काळाने पॅड बदलायला हवेत. 

 

टॅग्स : आरोग्ययोनीलाइफस्टाइलमहिलाहेल्थ टिप्स