Join us   

अंगावरुन पिवळट चिकट पाणी जातं, प्रचंड खाज येते? - लैंगिक संबंधांतून होणारा हा आजार कसा टाळायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2023 12:57 PM

Vaginal Trichomoniasis Women's Sexual Health Problems : लैंगिक संबंधातून पुरुषांना नव्हे तर फक्त महिलांना होणारा हा आजार, दुर्लक्ष करणं अत्यंत त्रासाचं?

डॉ. दाक्षायणी पंडित 

काल मी घरात शिरताना दारातून माझी शेजारीण अगदी मला ढकलून आत शिरली. तिच्या या घाईमुळे राग आणि आश्चर्याने माझा वासलेला आ तिने काहीतरी कोंबून बंद केला. तोंडात कोंबलेल्या नारळ वडीचा स्वाद कळताच रागोबा पळाले आणि मी झटक्यात वडी संपवली.  शेजारीण म्हणाली, “ही तुझी फी दिलीय, आता अर्जंट सल्ला हवाय. गेले चार दिवस मला सारखं पिवळट-हिरवट अंगावर जातंय. खाज तर विचारूच नकोस. शिवाय वाईट वास पण येतोय. यातून माझी सुटका कर बाई.” तिला ट्रायकोमोनियासिस हा आजार नवरोजींकडून मिळाला होता (Vaginal Trichomoniasis Women's Sexual Health Problems).

आजाराचं नाव –

योनिमार्गाचा दाह (व्हजायनल ट्रायकोमोनियासिस)

रोगकारक जंतू -

ट्रायकोमोनास व्हजायनॅलिस नावाचा पेअरच्या आकाराचा शेपटीवाला परजीवी जंतू. हा जंतू फक्त एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे लैंगिक संबंधाद्वारा पसरतो. तो फक्त मानवी शरीरात जिवंत राहू शकतो, इतरत्र नाही. 

(Image : Google)

लक्षणे –

पुरुष हे बहुतांश वेळा लक्षणरहित असतात पण बायकांना मात्र माझ्या शेजारणी सारखी लक्षणं असतात. हा परजीवी पुरुषांच्या शिस्नावरील (लिंगावरील) त्वचेवर राहतो. पण शारिरीक स्वच्छतेच्या अभावी पुरुषांनाही शिस्नाच्या त्वचेखाली संसर्ग आणि त्यायोगे दाह निर्माण होतो. (Balanitis-शिस्नदाह). बायकांना योनीमार्गाच्या अंत्स्त्वचेचा दाह होतो. खरं तर लक्षणं तीव्र असतात, घाणेरडा नकोसा वास आणि तीव्र खाज यामुळे सहसा बायका लवकरच डॉक्टरांकडे जातात. जास्त दिवस अंगावर काढल्यास लक्षणांची तीव्रता कमी होते पण आजार जुनाट होत जातो. योनीमार्गाची अंतस्त्वचा जाड होत जाते. 

१. सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे योनीमार्गातून पिवळसर हिरवट स्त्राव बाहेर येणे. क्वचित पॅड घ्यावे लागते. या स्त्रावाला वाईट वास असतो.

२. अतिशय त्रासदायक लक्षण म्हणजे योनिमुखाशी येणारी  वैतागवाणी तीव्र खाज. 

निदान- 

स्त्रावाचा रंग, वास आणि तीव्र खाज यावरच निदान केले जाते.  वैद्यकीय महाविद्यालयासारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थेतील स्त्रीरोग किंवा त्वचारोग वा गुप्तरोग विभागातील तज्ञ निदान करून औषधे देतात पण स्त्रावाचा नमुनाही तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवतात. या स्त्रावाच्या सूक्ष्मदर्शकीय चाचणीत हा जंतू पेअर सारखा आकार, शेपटी आणि त्याचे इकडून तिकडे सुळसुळ पळणे यामुळे सहज ओळखता येतो.

मैत्रिणींनो, हा आजार मागच्या लेखातील कँडिडियासीस या आजारासारखा वाटला तरीही जंतू वेगळ्या प्रकारचा असल्याने उपचार वेगळे असतात. पण या दोन्ही जंतूंचा संसर्ग एकाच वेळी होऊ शकतो आणि मिश्र लक्षणे दिसू शकतात. 

उपचार – 

यासाठी मेट्रोनिडॅझोल व त्याची काही भावंडे यांच्या तोंडाने घेण्याच्या गोळ्या सर्वाधिक उपयुक्त आहेत. इतर काही औषधे योनिमार्गाच्या आत ठेवण्याच्या गोळ्या, क्रीम तसेच जेल इ. प्रकारात उपलब्ध आहेत. महत्वाची गोष्ट दोन्ही लैंगिक सहकाऱ्यांनी एकाच वेळी वा डॉक्टर सांगतील तेव्हढे दिवस उपचार घेणं अत्यंत आवश्यक आहे. उपचार एकानेच घेतले किंवा अपुरे दिवस अथवा अपुऱ्या मात्रेत  घेतले  संसर्गाचा नायनाट होत नाही तर संसर्ग तसाच राहतो व पूर्ण उपचार घेऊन बरा झालेला तुमचा साथीदार पुन्हा संसर्गित होतो.  

प्रतिबंध-

रोज नियमित स्वच्छ आंघोळ हा सर्वात उत्तम प्रतिबंध. शरीर व अंतर्वस्त्रांची  स्वच्छता आणि निरोध (काँडोम) चा वापर यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होते.   

(लोखिका एम बी बी एस, एम डी. असून डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व चिकित्सा प्रयोगशाळेच्या प्रमुख निवृत्त प्राध्यापिका आहेत. )  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल