Join us   

डोक्याला ताप नुसता! बायकांना सतत का छळते डोकेदुखी, अवतीभोवतीचा कलकलाट तर जबाबदार नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 1:45 PM

अगं कालपासून माझं खूपच डोकं धरलंय... बाम लावून आणि डोकं बांधून झोपलेय मी... असं महिन्यातून एकदा आपण कुणाला तरी म्हणतो किंवा आपण कुणाचं तरी ऐकतो. पण हे प्रकरण वाटतंय तेवढं सोपं नाही बरं का... बायकांच्या डोकेदुखीची नाळ थेट स्वयंपाकघराशी जोडलेली आहे.

ठळक मुद्दे जर डोके दुखत असताना तुम्हाला अगदी शांत बसावे वाटत असेल आणि कुणी काहीच बोलू नये असे वाटत असेल, तर तुमची डोकेदुखीही घरातल्या कलकलाटामुळे आहे, हे लक्षात घ्यावे. 

बायका आणि डोकेदुखी हे समीकरण जरा जास्तच जुळलेलं आहे. बायकांची डोकेदुखी हा अनेक ठिकाणी आता चेष्टेचा विषय होऊन बसलाय. चारचौघात तर बायकांच्या डोकेदुखीवर चांगलेच विनोद केले जातात. पण बायका आणि डोकेदुखी ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून गमतीत घेण्यासारखी तर अजिबातच नाही. कारण घरातल्याच काही गोष्टींचे कायम किर्रर्र करणारे आवाज बायकांच्या डोकेदुखीसाठी कारण ठरत आहेत, असे काही अभ्यासात सांगण्यात आले आहे.

 

वर्किंग वुमन असो किंवा गृहिणी त्यांचा अधिकाधिक वेळ घरातच जातो. यातही वर्किंग वुमन घरातले कामं फटाफट उरकून चटकन आपल्या कामालाही लागतात. पण गृहिणी मात्र अधिकाधिक वेळ घरकामातच अडकलेल्या असतात. म्हणूनच जर बायका आणि डोकेदुखी यांचे बारकाईने निरिक्षण केले तर डाेकेदुखीची समस्या ही वर्किंग वुमनपेक्षा गृहिणींमध्ये अधिक असल्याचे लक्षात येते. 

 

ही आहेत बायकांच्या डोकेदुखीची कारणे

- वाचून तुम्ही कदाचित अचंबित व्हाल. पण स्वयंपाकघर हे बायकांच्या डोकेदुखीचे सगळ्यात मोठे कारण आहे, असे काही अभ्यासकांनी सांगितले आहे. स्वयंपाकघरात सकाळच्या वेळी महिलांना प्रचंड गडबडीचा सामना करावा लागतो. सगळ्यांचे डबे, नाश्ता, जेवण अशा वेळा सांभाळायच्या असल्याने महिलांना एकाचवेळी अनेक पातळ्यांवर अक्षरश: लढावे लागते. 

- हा सगळा ताण दीड- दोन तासच असतो. पण तो रोजच्या रोज झेलावा लागतो. अशा या सगळ्या ताणतणावांमध्ये कुकरची शिटी, एक्झॉस्ट फॅनचा भर्रर्र आवाज, पंखा असल्यास पंख्याचा आवाज, मिक्सर, ग्राईंडर, इंडक्शन असे अनेक आवाज, अगदी प्रत्येकवेळी फोडणी देताना येणारा चर्रर्र आवाज हे सगळे आवाज ऐकणे नकोसे होऊन जाते. 

 

- यातही भांडी घासताना किंवा भांडी लावताना त्यांचा होणारा खणखणाटही हळूहळू डोक्यात जाऊ लागतो आणि डोके उठवणारा ठरतो.

- याव्यतिरिक्त वॉशिंग मशिन अनेक घरांमध्ये रोज लावले जाते. त्याचा रेग्युलर होणारा आवाज आणि कपडे धुवून झाल्यावर एक मिनिटासाठी वाजणारा टायमर ऐकताना तर अनेक जणींना नकोसे होऊन जाते. 

- याशिवाय घरातली लहान मुलं, त्यांचे रडणं, कधीकधी गरजेपेक्षा जास्त जोरात बाेलणं, किंचाळणं, जोरजोरात ओरडत खेळणं, टीव्ही आणि रेडियोचा आवाज असे अनेक कलकलाट बायकांना दिवसभर घरात बसून ऐकावे लागतात.

 

- बरं वरील सगळे आवाज केवळ आपल्याच घरातले असतात असंही नाही. आजूबाजूच्या घरांमधूनही हे सगळे आवाज येतच असतात. तसेच रस्त्यांवरच्या वाहनांचा आवाज, हॉर्नही ऐकावा लागतो. आवाजांचा हा कलकलाट महिलांच्या डोकेदुखीसाठी मोठे कारण ठरला आहे.

- त्यातुलनेत ऑफिसमध्ये हे सगळे आवाज नसतात. ऑफिसची शिस्त राखायची असल्याने ऑफिसेसमध्ये अनेकदा पिनड्राॅप सायलेन्स असतो. त्यामुळेच तर डोकेदुखीची समस्या सगळ्यात जास्त घरी राहणाऱ्या बायकांना सतावत आहे.

 

- आपल्यालाही याच कारणांमुळे डोकेदुखीचा त्रास होत आहे, हे ओळखण्याचा एक सोपा उपाय आहे. जर डोके दुखत असताना तुम्हाला अगदी शांत बसावे वाटत असेल आणि कुणी काहीच बोलू नये असे वाटत असेल, तर तुमची डोकेदुखीही घरातल्या कलकलाटामुळे आहे, हे लक्षात घ्यावे. 

 

टॅग्स : आरोग्यमहिलाहेल्थ टिप्स