Join us   

...म्हणून वसुबारसेला गाईला दाखवतात बाजरीची भाकरी-गूळ आणि गवारीच्या भाजीचा नैवेद्य, पारंपरिक आहाराचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2023 9:24 AM

Vasubaras Naivedya Importance Diwali : गोधन हे अतिशय उत्तम मानले जात असल्याने या दिवशी गोपूजेला विशेष महत्त्व आहे.

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस यालाच गोवत्स द्वादशी म्हणून ओळखले जाते. दिवाळीचा पहिला दिवा म्हणजेच हा दिवस. अर्थातच गायीची पूजा करुन दिवाळीची सुरुवात करण्यात येते. वर्षानुवर्षे ही परंपरा पाळत राज्यात सर्वत्र या खास दिवसाचे सेलिब्रेशन केले जाते. गोधन हे अतिशय उत्तम मानले जात असल्याने या दिवशी गोपूजेला विशेष महत्त्व आहे. देवता मानलेल्या गायीला गोडाचा आणि भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामागे धार्मिक कारणे असतील तरी आरोग्याच्या दृष्टीनेही हे पदार्थ खाण्यास सुरुवात केली जाते. गूळ, बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी असा नैवेद्य या दिवशी आवर्जून केला जातो त्यामागे नेमके काय महत्त्व आहे ते पाहूया (Vasubaras Naivedya Importance Diwali)...

१. गूळ खाण्याचे महत्त्व

थंडीच्या दिवसांत गोड खाल्ल्याने थंडीपासून शरीराचे संरक्षण होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. म्हणून या काळात गूळ आवर्जून खाल्ला जातो. गुळामुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच पण त्यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी चांगली राखण्यासाठी गूळ आवर्जून खाण्याचा सल्ला दिला जातो. बाजरीच्या भाकरीसोबत गुळ आणि तूप घालून खाल्ल्यास थंडीच्या काळात हा अतिशय उत्तम आहार ठरु शकतो.  

(Image : Google )

२. थंडीत बाजरी आरोग्यदायी

दिवाळी म्हणजे साधारपणे थंडी सुरू होण्याचा कालावधी. थंडीमध्ये साधारणपणे बाजरीची भाकरी आवर्जून खाल्ली जाते. शरीरातील उष्णता दिर्घकाळ टिकून राहावी यासाठी बाजरी उपयुक्त असते. गायीला आपल्या संस्कृतीत देव मानलेले असल्याने गायीची पूजा करुन तिला नैवेद्य दाखवून मग आपण तो खाण्याची प्रथा आहे. त्यामुळे वसुबारसेमागे धार्मिक आणि आरोग्यदृष्ट्या असे दोन्ही महत्त्व असून ते आपण लक्षात घ्यायला हवे. 

३. म्हणून गवार खायलाच हवी 

गवार ही अतिशय औषधी भाजी असून त्यामध्ये प्रोटीन, फायबर्स, कार्बोहायड्रेटस, व्हिटॅमिन्स हे सगळे मुबलक प्रमाणात असते. याशिवाय गवारीमध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियमही मोठ्या प्रमाणात आढळून येते. गवारीत कोलेस्टेरॉल किंवा फॅटस नसल्याने आरोग्यासाठी ही भाजी खाणे फायदेशीर मानले जाते. हाडांच्या मजबुतीसाठी, डायबिटीस, हृदयाचे आरोग्य, रक्तदाब, त्वचाविकार यांवर गवारीची भाजी वरदान मानली गेली आहे. हिवाळ्याच्या आधी पावसाळा असल्याने त्या काळात भाज्या खाण्याचे प्रमाण कमी असते पण थंडीत मुबलक भाज्या असल्याने या काळात भाज्या खाण्यास सुरुवात केली जाते. 

टॅग्स : दिवाळी 2023आरोग्यआहार योजना