पावसाळा संपला तरी भारताच्या बहुतांश भागात सध्या पावसाचा जोर अद्यापही ओसरलेला नाही. पावसाळ्यात आपल्याला गरम, चमचमीत खायला आवडत असले तरी या काळात हवेतील दमटपणामुळे आणि पाण्यातील अशुद्धतेमुळे बरेच संसर्गजन्य आजार पसरतात. या काळात डासांची संख्याही वाढल्याने डेंगी, चिकनगुन्या, संसर्गजन्य ताप-सर्दी यांच्या रुग्णांचे प्रमाण वाढते. अशुद्ध पाण्यामुळे अतिसार, अपचन यांसारख्या समस्याही निर्माण होतात. तसेच हवेतील विषाणूंमुळे विविध संसर्गजन्य आजार पसरतात. पावसाळ्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळेच या काळात खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते (Vegetables to Avoid in Rainy Season Harmful for Health).
हिवाळ्यात ज्याप्रमाणे आपण सगळ्या भाज्या, फळे जास्त प्रमाणात खाऊ शकतो, त्याप्रमाणे पावसाळ्यात मात्र यांचे सेवन करणे म्हणावे तितके चांगले नसते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल-शर्मा याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स देतात. पावसाळ्याच्या दिवसांत कोणत्या भाज्या खाणे आरोग्यासाठी घातक असते याविषयी त्या माहिती देतात. काही भाज्या आपल्याला किंवा घरातील लोकांना खूप आवडतात, त्यामुळे आपल्याकडे आठवड्यातून एकदा तरी या भाज्या वेगवेगळ्या स्वरुपात केल्याच जातात. मात्र पावसाळ्याच्या दिवसांत तब्येत चांगली ठेवायची तर या भाज्या आवर्जून टाळायला हव्यात. या भाज्या कोणत्या ते पाहूया.
१. फ्लॉवर
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही भाजी पाऊस पडत असेल तर खाऊ नये. पावसाळ्याच्या काळात साधारणपणे फ्लॉवरचे पीक होत नाही. त्यामुळे तो खूप जुना असण्याची शक्यता असते. जुन्या भाजीमध्ये किडे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने आणि फ्लॉवरमधले किडे लवकर दिसत नसल्याने ही भाजी टाळलेलीच बरी.
२. पालेभाज्या
पालेभाज्या आणि हिरव्या भाज्या आरोग्यासाठी अतिशय चांगल्या असल्याने त्यांचा आहारात समावेश करायला हवा असे आपल्याला नेहमी सांगितले जाते. हे जरी खरे असले तरी पावसाळ्यात जीवाणूंची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. तसेच पालेभाज्या ही त्यांच्यासाठी अतिशय चांगली जागा असल्याने त्याठिकाणी जास्त जीवाणू असतात. या काळात पालेभाज्या दूषित असल्याने आरोग्यासाठी त्या अजिबात चांगल्या नसतात.
३. वांगी
वांग्याचे भरीत, भरलं वांगं किंवा वांग्याचा रस्सा आपल्यापैकी अनेकांना मनापासून आवडतो. मात्र पावसाळ्याच्या दिवसांत वांग्यामध्ये किडे होण्याची शक्यता असल्याने या काळात वांगी खाणे टाळावे. या काळात वांगी खाल्ल्याने खाज सुटणे, त्वचेवर चट्टे उठणे, पोटातील संसर्ग अशाप्रकारच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात शक्यतो वांगी खाणे टाळलेले केव्हाही चांगले.