निवेदिता पाठक
पाऊस येतो जातो असंच अजूनही वातावरण आहे. काहींना व्हायरल तापाचा त्रास होतो आहे. लहान मुलं, आजीआजोबाही अनेक ठिकाणी ताप, अंगदुखी, सर्दी पडसे यामुळे त्रासले आहेत. कफाचा त्रास झाल्यानं झोप कमी होतो. भूक लागत नाही, तोंडाला चव नाही पण गोळ्या औषधं घ्यायची तर खायलाच हवं असे आग्रह असतात. खरंच ताप आलेला असतो तेव्हा बळजबरी खावे का? किती आणि काय खावे? ताप आलेला असेल तर अनेकांना भूक लागत नाही. पित्त वाढते. मळमळते. डोके दचखते. तोंडाला चव नसते. अशावेळी पचनशक्तीला विनाकारण त्रास न देता अतीखाणे, बळजबरी, पचायला जड पदार्थ खाणे टाळावे. भूक नसताना खाल्ले तर पचनशक्तीवर ताण येतो.
(Image : google)
अशावेळी काय करावे?
१. थोडे थोडे कोमट पाणी प्यावे. २.बळजबरी खाऊ नये. भूक लागेल तेव्हा भाताची पातळ पेज, साळीच्या लाह्या, अगदी मऊ पातळ खिचडी असे घ्यावे ३. सूप चालेल पण शक्यतो डाळीचे कढण, टमाटा किंवा अन्य भाज्यांचे क्लिअर सूप प्यावे, चमचमीत सूप नको. ४. आमसूलाचे सारही चालेल. ५. चांगली भूक लागली असे वाटले तर वरणभात किंवा कुस्करुन वरणपोळी खायला हरकत नाही. शक्यतो मुगाच्या डाळीचे वरण करावे. घट्ट भात, मुगाचं वरण,तूप आणि लिंबू असं खायला हरकत नाही. ६. मसालेदार भाज्या खाऊ नयेत. ७. फळं आणि कोशिंबीरीही टाळणे योग्य. ८. फळं म्हणून डाळिंब चालेल, मोसंबी-चिकूही चालेल बाकी नको. १०. ब्रेड, बिस्किटं शक्यतो टाळावीत. ११. प्रोटीनचा मारा याकाळात करु नये. १२. ताप कमी झाला की हळूहळू आहार वाढवावा.
( लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)