सर्दी, खोकला आणि ताप यांचे रुग्ण मागील काही दिवसांपासून अगदी घरोघरी असल्याचे दिसत आहे. विशेषत: लहान मुलांमध्येही या सगळ्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. गळणारं नाक, खोकला आणि अशक्तपणा यांमुळे लहानगी अगदीच हैराण झाली आहेत. पुन्हा पुन्हा येणाऱ्या तापाचं कारण काय, कशानं सतत अंग गरम होतं, ढास लागते, घसा दुखतं हे पालकांनाही कळत नाही. त्यात मुलांच्या वार्षिक परीक्षा जवळ आल्याने त्यांना शाळेत जाण्याशिवाय पर्याय नाही. सध्या कोरोना व्हायरसप्रमाणेच ॲडिनो व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाप्रमाणेच थुंकी, शिंक याद्वारे हा व्हायरस वेगाने पसरतो आहे. आता प्रश्न असा आहे की त्यावर उपाय काय (Viral Infection Cold-Cough and Fever)?
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर सांगतात..
१. हा व्हायरस साधारणपणे लहान मुलांकडून मोठ्यांकडे संक्रमित होतो. लहान मुलं शाळेत जात असल्याने एकमेकांच्या सहवासातून अगदी सहज हा संसर्ग पसरतो. आपल्याला सर्दी-खोकला झाला तर आपण ज्याप्रमाणे धुळीत न जाणे, तोंडावर रुमाल धरणे, हात स्वच्छ धुणे अशा सगळ्या गोष्टी काटेकोरपणे करत असतो. पण लहान मुलं मात्र याबाबत पुरेशी काळजी घेत नाहीत. त्यामुळे त्यांचा आजार जास्त काळ टिकणारा असतो. प्रत्यक्षात लहान मुलांची प्रतिकारशक्ती मोठ्यांपेक्षा चांगली असते, पण यावर वेळीच उपाययोजना केल्यास समस्या लवकर बरी होण्यास मदत होते.
२. विषणूजन्य समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा सल्ल्याने लगेचच अँटीबायोटीक्स घेण्याची आवश्यकता नसते. विषाणूजन्य आजारावर कोणतेही नेमके औषध नसते, त्यामुळे काही दिवसांत विषाणूचा प्रभाव कमी झाला की सर्दी, खोकला, नाक गळणे, डोकेदुखी, ताप या समस्या कमी होतात. मात्र आपण लगेचच मनाने काही औषधे घेण्याची घाई करतो. मग त्याने तात्पुरते बरे वाटते पण नंतर पुन्हा हा विषाणू वेगाने डोकं वर काढतो. मग आपण डॉक्टरांकडे जाऊन औषधं घेतो. औषधांमुळे काहीवेळा जुलाब होतात, तर कधी आणखी काही. त्यामुळे हे औषधजन्य चक्रव्यूह वाढत जाते.
काळजी काय घ्यायची?
१. गुळण्या करणे
२. हळद-दूध घेणे
३. कोमट पाणी पिणे
४. कमीत कमी लोकांच्या संपर्कात राहणे.
५. जास्तीत जास्त पाणी पीत राहणे
६. पाणी नसेल जवळ तर ग्लुकॉनडी, ओआरएस, सरबतं पिणे.
७. घशाला आराम मिळण्यासाठी शक्य तितके शांत बसणे, कमीत कमी बोलणे.