Join us   

व्हिटॅमिन B12 आणि D3 च्या कमतरतेमुळे होऊ शकतात गंभीर आजार, तज्ज्ञ सांगतात ५ लक्षणं दिसल्यास सावधान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 3:56 PM

Symptoms of Vitamin B12 and D3 deficiency: आरोग्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या या २ घटकांकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं. भारतात तर ७० टक्के महिलांमध्ये व्हिटॅमिन B12 आणि D3 ची कमतरता दिसून येते.

ठळक मुद्दे Coutinho यांच्या मते व्हिटॅमिन D3 हे केवळ एक व्हिटॅमिन नाही, तर शरीरासाठी अतिशय आवश्यक असणारं हार्मोन आहे.

पोट भरायचं म्हणून खायचं किंवा जेवायचं म्हणून जेवायचं ही अनेकांची विचारसरणी. यात आपण खरोखरंच शरीराच्या दृष्टीने किती आवश्यक पौष्टिक अन्न घेत आहाेत, जे खातो आहे, त्यातून आपल्याला सगळी पोषणमुल्ये मिळतात का, असा विचार करणारे खूपच कमी असतात. यात महिला तर खूपच मागे आहेत. आपल्या मुलांना, नवऱ्याला, इतर कुटूंबियांना अगदी हौसेने आणि सवडीने वेगवेगळे पौष्टिक पदार्थ खाऊ घालतात. पण स्वत:च्या बाबतीत मात्र नेहमीच दुर्लक्ष करतात आणि सगळ्यांचं जेवण होऊन जे उरलंय ते खाऊन पोट भरतात. यामुळेच भारतातील बहुतांश महिलांमध्ये व्हिटॅमिन B12 आणि D3 ची कमतरता (Vitamin B12 and D3 deficiency) दिसून येते. 

 

व्हिटॅमिन D3 चे महत्त्व व्हिटॅमिन डी चे २ मुख्य प्रकार आहेत. एक नैसर्गिकरित्या काही वनस्पतींमधून आपल्याला मिळते तर दुसरे सुर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर आपल्या त्वचेमध्ये तयार होते. अभ्यासक Luke Coutinho यांच्या मते आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीवर, म्हणजे अगदी मेंदूपासून ते हाडांपर्यंत, प्रत्येकाच्या पृष्ठभागावर व्हिटॅमिन डी 3 रिसेप्टर्स असतात. शरीरातील जनुकीय बदलांसाठीही व्हिटॅमिन डी ३ ची कमतरता कारणीभूत ठरू शकते, असं त्यांचं म्हणणं आहे. याशिवाय शरीरातील पांढऱ्या पेशींची निर्मिती, प्रतिकारशक्ती वाढवणे, थायरॉईड आणि सेक्स हार्मोन्सचे नियंत्रण, हाडांचे आरोग्य, इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवणे अशा काही महत्त्वाच्या गोष्टींसाठीही व्हिटॅमिन D3 अतिशय गरजेचे आहे. म्हणूनच Coutinho यांच्या मते व्हिटॅमिन D3 हे केवळ एक व्हिटॅमिन नाही, तर शरीरासाठी अतिशय आवश्यक असणारं हार्मोन आहे.

 

व्हिटॅमिन B12 चे महत्त्व व्हिटॅमिन D3 प्रमाणेच व्हिटॅमिन B12 अतिशय आवश्यक आहे. व्हिटॅमिन B12 ची कमतरता थेट आपल्या शरीरातील उर्जेवर परिणाम करते. त्यामुळे खूप जास्त थकवा जाणवतो. शरीरातील लाल रक्तपेशींचं उत्पादन कमी प्रमाणात होतं. त्यामुळे आपोआपच ॲनिमियाचा त्रास होतो. व्हिटॅमिन B12 ची कमतरता आपल्या मज्जासंस्थेवर म्हणजेच Nerve health वर देखील परिणाम करते. यामुळे मेंदूचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे व्हिटॅमिन B12 ची कमतरता अजिबात हलक्यात घेऊ नका, असे आवाहन अभ्यासक करतात. 

 

व्हिटॅमिन B12 आणि D3 ची कमतरता असल्यास... व्हिटॅमिन B12 आणि D3 या दोन्ही गोष्टींची कमतरता शरीरावर खूप वेगवेगळ्या मार्गांनी परिणाम करते. खालील लक्षणं सातत्याने जाणवत असतील तर त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. व्हिटॅमिन B12 आणि D3 ची तपासणी करून घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यावर इलाज सुरू करा. - सातत्याने होणारी अंगदुखी, थकवा. - हार्मोन्सचे असंतुलन - नखं आणि हाडे ठिसूळ असणे - स्मरणशक्ती कमी होणे, सतत काहीतरी विसरणे - महिलांमध्ये PCOS चा त्रास असणे - सातत्याने व्हिटॅमिन B12 आणि D3 ची कमतरता असेल तर कॅन्सर, अल्झायमर किंवा मेंदूचे विविध आजारही उद्भवू शकतात, असं तज्ज्ञ सांगतात.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न