Join us   

'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेने हाडंच ठिसूळ होत नाहीत, छळतात मेंदूचे ४ विकार: अभ्यास सांगतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2022 10:25 AM

Vitamin D Deficiency Causes Neurological Disorders : खरंतर रोज सकाळी कोवळ्या उन्हात २० मिनिटं बसले तरी हा प्रश्न सुटू शकतो.

ठळक मुद्दे दररोज १००० ते २५०० मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त व्हिटॅमिन डी घेणे आरोग्यासाठी चांगले नसते. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स वाढण्याची शक्यता असते.    ज्यांना आतड्यांसंबंधी समस्या, कोलायटीस, पचनाशी निगडीत समस्या आहेत अशांना व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा धोका जास्त प्रमाणात असतो. 

व्हिटॅमिन डी हे आपल्या आरो्ग्यासाठी अतिशय आवश्यक असते. हे माहित असूनही वेळीच योग्य ते लक्ष न दिल्याने या व्हिटॅमिनची कमतरता जाणवते. या कारणाने हाडे दुखणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, त्वचा आणि केसांच्या समस्या, स्नायूंमधील ताकद कमी होणे, सतत मूड बदलणे अशा अनेक समस्या उद्भवतात. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी (Vitamin D)चा मुख्य स्त्रोत असतो. उष्ण कटिबंधात आपला देश असूनही अनेकांच्या शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता असते. शरीरात पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी नसले तर शरीरात कॅल्शियम शोषून घेण्याच्या कार्यात अडथळा येतो आणि शरीरामध्ये कॅल्शियमचीही कमतरता उद्भवते. त्यामुळे सकाळी कोवळ्या उन्हामध्ये बसण्याचा सल्ला डॉक्टर वारंवार देतात  (Vitamin D Deficiency Causes Neurological Disorders). 

(Image : Google)

भारतात जवळपास ७६ टक्के लोकांना व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याचे आढळून आले आहे. ही कमतरता मग अनेक आजारांना आमंत्रण देते आणि त्यातून मग रोगप्रतिकारशक्ती कमी होते.  कोवळ्या उन्हात बसून व्हिटॅमिन डी मिळावं म्हणून आपण प्रयत्न करत नाहीत. खरंतर रोज सकाळी कोवळ्या उन्हात २० मिनिटं बसले तरी हा प्रश्न सुटू शकतो. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने काही समस्या उद्भवल्या की मगच आपल्याला या गोष्टीची जाण होते. त्यामुळे आरोग्याच्या कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष न करता योग्य ती काळजी घ्यायला हवी. 

मेंदूविकाराबाबत अभ्यास काय सांगतो...

आता या झाल्या शारीरिक तक्रारी. पण व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर मेंदूचे विकार होण्याचीही शक्यता असते. व्हिटॅमिन डी कमी असेल तर न्यूरोलॉजिकल आजार आणि न्यूरोसायकोलॉजिकल डिसऑर्डर उद्भवण्याची शक्यता असते. यामध्ये मल्टीपल स्क्लेरोसिस, अल्झायमर , पार्किन्सन्स आणि न्यूरोकॉग्निटिव्ह विकार यांचा समावेश होतो. तसेच व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर व्यक्तीला नैराश्यही येतं. २०१७ मध्ये मरनल ऑफ डायबिटीस रिसर्चमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, ज्या महिलांना टाइप २ डायबिटीस असतो त्यांनी व्हिटॅमिन डी ची सप्लिमेंटस घेतल्यास त्यांचा मूड सुधारण्यास मदत होते. 

(Image : Google)

व्हिटॅमिन डी कमतरतेचा धोका कोणाला जास्त? 

व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर डॉक्टर काही सप्लिमेंटस देतात. पण ज्यांच्या शरीरात जास्त प्रमाणात कमतरता आहे त्यांना मात्र आरोग्याच्या विविध समस्या उद्भवण्याची शक्यता असते. ज्यांना आतड्यांसंबंधी समस्या, कोलायटीस, पचनाशी निगडीत समस्या आहेत अशांना व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा धोका जास्त प्रमाणात असतो. 

दररोज किती प्रमाणात व्हिटॅमिन डी घ्यायला हवे?

एका तरुण व्यक्तीला दिवसाला १० ते  २० मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते. तर नवजात अर्भक, लहान मुले , वाढत्या वयातील मुले आणि वयस्कर व्यक्ती यांना व्हिटॅमिन डी ची आवश्यकता जास्त प्रमाणात असते. पण प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक गरजेनुसार ही आवश्यकता कमी-अधिक होते, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट घेतलेली केव्हाही चांगली. दररोज १००० ते २५०० मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त व्हिटॅमिन डी घेणे आरोग्यासाठी चांगले नसते. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स वाढण्याची शक्यता असते.    

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल