Join us   

दिवसभरातील स्टेप काऊंट्स वाढवायचा आहे? ६ टिप्स, स्टेप काऊंट्स नक्की वाढेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2023 6:41 PM

Weight Loss Tips : Ways To Increase Daily Step Count : स्टेप काऊंट्स अ‍ॅप वापरून देखील दिवसा १०,००० पाऊले चालण्याचे टार्गेट पूर्ण होत नाही यासाठी टीप्स समजून घेऊ.

निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. पळणे, दोरी उड्या, स्विमिंग, सायकलिंग अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करता येऊ शकतात. या सगळ्यांपैकी सर्वात सोपा आणि स्वस्त व्यायाम प्रकार कोणता असेल तर तो म्हणजे चालण्याचा व्यायाम आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळी चालण्याचा व्यायाम करता येतो. त्याचप्रमाणे चालण्याच्या व्यायामासाठी कोणतीही विशेष साधने खरेदी करावी लागत नाहीत. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सगळेच चालण्याचा व्यायाम अतिशय सहज करू शकतात. सध्या व्यायाम करण्यासाठी बाजारांत विविध प्रकारची उपकरणे विकत मिळतात. यासोबतच हल्लीच्या मोबाईल आणि घड्याळ्यांमध्ये देखील स्टेप काऊंट्स नावाचे अ‍ॅप असते. या अ‍ॅपमध्ये आपण दिवसभरात किती पाऊल चालतो. ही  पाऊल मोजली जातात. पाऊल मोजून दिवसाअखेरी आपण किती पाऊल चाललो? आपल्या किती कॅलरीज बर्न झाल्या याचा रेकॉर्ड आपल्याला दाखवते. दिवसा अमुक हजार पाऊल चालायची असे आपण ठरवतो. परंतु कधी कधी आपले हे चालण्याचे टार्गेट पूर्ण होत नाही. अशा वेळी काय करायचे ते काही टीप्सच्या माध्यमातून समजून घेऊ(Weight Loss Tips : Ways To Increase Daily Step Count).

काय काय करता येऊ शकते ? 

१. रिमाइंडर्स लावा - दिवसभराच्या बिझी शेड्युलमध्ये चालण्यासाठी खास वेळ मिळत नसेल तर रिमाइंडर्स लावा. दर ३० मिनिटांनंतर किमान ३ मिनिटे उठून चालण्याची सवय ठेवावी. मोबाईलमध्ये दर अर्ध्या तासानंतर चालण्यासाठीचा एक रिमाइंडर सेट करून ठेवावा. यामुळे आपल्याला चालण्याची सवय लागेल.      

२. चालण्यासाठी छोटे ब्रेक घ्या - जर आपण घरकाम किंवा ऑफिसमध्ये काम करण्यात व्यस्त असाल तर बिझी शेड्युलमधून चालण्यासाठी छोटे ब्रेक घ्या. रोजच्या डेली रुटीनमधून वेळ काढून घरात किंवा घराबाहेर किमान १० ते  २० मिनिटे चाला. घराबाहेर चालल्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल व त्यासोबतच चालण्याचा व्यायामही होईल.    

३. लिफ्टचा वापर टाळा - आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासादरम्यान लिफ्टचा वापर करणे टाळा. लिफ्टचा वापर करण्यापेक्षा पायऱ्यांचा वापर करा. जिना चढ - उतर केल्याने तुमचा व्यायाम होईल. पायऱ्या चढ - उतर केल्याने पायांच्या स्नायूंना बळकटी मिळते. जिना चढ - उतर केल्याने कॅलरीज बर्न होण्यास मदत होईल. 

४. गाडी लांब पार्क करा - ऑफिसमध्ये किंवा कामानिमित्त बाहेर प्रवास करणार असाल तर आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणाहून गाडी थोडी लांब पार्क करा. तसेच उरलेले अंतर पायी चालत जाण्याची सवय करून घ्या. गाडी लांब पार्क केल्याने गाडी पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पायी चालत यावे लागेल. यामुळे आपोआपच रोज किमान १० ते १५ मिनिटे चालण्याचा व्यायाम न कळत होऊन जाईल. यासोबतच दिवसभराचे चालण्याचे टार्गेटही पूर्ण होईल.  

५. मित्र - मैत्रिणींसोबत चाला - ऑफिसमधील मित्र - मैत्रिणींसोबत चहा, कॉफी पिण्यासाठी जाण्यापेक्षा त्यांच्यासोबत गप्पा मारत चालण्याचा व्यायाम करा. मित्र - मैत्रिणींसोबत गप्पा मारत चालल्याने न कळत आपण कमी वेळात अधिक अंतर चालत कापतो.  

६. अ‍ॅक्टिव्हिटी करण्यावर भर द्या -  आऊट डोअर अ‍ॅक्टिव्हिटी करण्यावर जास्त भर द्या. चालण्यासोबतच, घराबाहेर आऊट डोअर अ‍ॅक्टिव्हिटी आवर्जून करा. स्विमिंग, सायकलिंग, गार्डनिंग यांसारख्या वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटी केल्याने आपले शरीर अ‍ॅक्टिव्हिटी राहण्यास मदत होते.

टॅग्स : हेल्थ टिप्स