मधुमेह (diabetes) म्हणजे जीवनशैलीशी निगडित आजार. मधुमेह हा असा आजार आहे जो अनेक गंभीर आरोग्यविषयक समस्या निर्माण करतो. केवळ प्रौढांनाच हा आजार होतो असं नाही. कमी वयातल्या स्त्री पुरुषांना मधुमेह होण्याची संख्या वाढली आहे. मधुमेहामागे आनुवांशिकता हे एक कारण असतं. पण बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेही रुग्णांची संख्या वाढत असल्याचं अभ्यास आणि संशोधनाचे निष्कर्ष सांगत आहेत. मधुमेह हा त्याच्या प्रारंभिक अवस्थेत लक्षात आल्यास पुढील धोके टाळता येतात. मधुमेह झाल्याची लक्षणं चेहेऱ्यावरुनही (warning signs of diabetes on face) सहज ओळखता येतात असं अभ्यासक म्हणतात. त्यामुळे आपल्या रंगरुपात काही बदल जाणवत असल्यास, एखादी सौंदर्यसमस्या अचानक उद्भवली आहे असं लक्षात आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता सतर्क होणं आपल्या डाॅक्टरांकडे जाऊन तपासणी करणं आवश्यक आहे. कारण चेहेऱ्याच्या बदलेल्या नूरचा मधुमेहाशी संबंध असू शकतो. मधुमेह जर प्राथमिक टप्प्यातच लक्षात आला तर इतर आरोग्यविषयक समस्यांचा धोका टाळता येतो आणि मधुमेह नियंत्रित करणंही सोपं जातं.
Image: Google
चेहेऱ्यावरील चार बदल मधुमेहाची लक्षणं असू शकतात.
1. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास सुरुवात होते. त्याचा परिणाम शरीरावर दिसायला लागतात. मधुमेहाची लक्षणं चेहेऱ्याच्या त्वचेवरुनही ओळखता येतात. मधुमेह असल्यास चेहेऱ्याचा रंग बदलून तो पिवळसर दिसतो. चेहेरा पांढरा पडल्यासारखा वाटतो.
2. त्वचेचा बदलेला पोत हे मधुमेहाचं लक्षण असू शकतं. अनेकांची त्वचा मुळातच रुक्ष असते. पण ज्यांची त्वचा रुक्ष नाही त्यांची त्वचा रुक्ष होणं, रुक्ष असलेल्यांची त्वचा आणखी कोरडी पडणं हे मधुमेहाचं लक्षण असू शकतं. मधुमेहाच्या समस्येत सतत लघवीला जावं लागतं. यामुळे शरीरातील पाणी कमी होतं. परिणामी त्वचा रुक्ष होते.
Image: Google
3. रक्तातील साखर वाढल्यास त्याचा परिणाम म्हणून सौंदर्य समस्या निर्माण होतात. चेहेऱ्यावर काळे,लालसर डाग पडतात. चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या वाढतात. वाढत जाणाऱ्या सौंदर्य समस्या हे मधुमेहाचं प्राथमिक लक्षण आहे.
4. चेहेऱ्यावर काळे डाग पडणं, डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण होणं, त्वचा सैल पडणं , डोळे सूजणं हे बदलही मधुमेहाची लक्षणं आहेत. मधुमेहामुळे त्वचेची लवचिकता कमी होते आणि त्वचा सैल पडते. मानेकडची त्वचा जास्त काळपट दिसते. त्वचेचा पोत कडक होतो. चेहेरा आणि त्वचेवरील हे बदल मधुमेहाचा धोका सांगत असतात. म्हणून या लक्षणांकडे डोळेझाक न करता वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घेणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल!