‘स्लिप घातली नाही तर मला कसंतरीच वाटतं’. ‘कपड्याच्या आत स्लिप नसेल तर खूप मोकळं, मोकळं वाटतं.’ अशाप्रकारचे डायलॉग आपण अनेकदा ऐकतो. जिन्सवरचा टॉप, कुर्ता किंवा अगदी पंजाबी ड्रेस काहीही असले तरी तरुणी स्लिप वापरतातच. यामध्ये कम्फर्टचा जास्त भाग असतो. एखाद्या ड्रेसचे कापड अंगाला चिकटणारे असेल, पातळ असेल तर स्लिप वापरणे ठिक आहे. पण आतमध्ये ब्रेसियर असताना पुन्हा त्यावरुन स्लिप घालण्याची खरंच आवश्यकता असते का? याचा विचार केल्यास अशाप्रकारे नियमितपणे स्लिप वापरण्याची आवश्यकता नसते. मात्र आपल्याला सवय असल्याने किंवा जास्त कम्फर्टेबल वाटावे म्हणून आपण स्लिप घालतो. आता अशाप्रकारे स्लिप घालण्याचे काय तोटे आहेत पाहूया...
फुगल्यासारखे किंवा जाड दिसतो
कपडे अंगाला व्यवस्थित बसत असतील तर त्यामुळे आपण बारीक दिसतो. पण ब्रेसियर, त्यावर स्लिप आणि त्यावर ड्रेस यामुळे आपण फुगल्यासारखे दिसतो. अनेकदा यामुळे आपण आहोत त्यापेक्षा जाड दिसण्याचीही शक्यता असते.
जास्त घाम येतो
एकावर एक जास्त कपडे घातल्याने आपल्याला गरम होते. त्यामुळे आपल्याला घाम येण्याचीही शक्यता असते. मग या घामामुळे चिकचिक होणे, अंगाला वास येणे अशा समस्या उद्भवू शकतात. काही वेळा हा घाम जास्त झाल्यास छाती आणि पोटाच्या भागावर पुरळ येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आवश्यकता नसल्यास स्लिप वापरण्याची गरज नाही.
शरीराला पुरेशी मोकळी हवा मिळत नाही
शरीराला मोकळी हवा मिळण्याची आवश्यकता असते. स्लिप घालून त्यावर कपडे घातल्याने शरीराला पुरेशी मोकळी हवा मिळत नाही. त्यामुळे शरीर मोकळेपणाने श्वास घेऊ शकत नाही. शरीराला योग्य पद्धतीने हवा लागल्यास त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पण हेच आपण खूप बंद ठेवले तर मात्र कोंडल्यासरखे होऊ शकते.
एकावर एक पट्ट्या दिसतात
अनेकदा काही कपड्यांचा रंग गडद असतो, कापडही चांगेल असते. अशावेळी स्लिपची आवश्यकता नसते. परंतु तरीही तुम्हाला स्लिप वापरायची सवय आहे म्हणून तुम्ही स्लिप घातली तर खांद्यावर दोन वेगळ्या पट्ट्या दिसतात. चुकून कोणी खांद्यावर हात ठेवला तरी या दोन पट्ट्या असल्याचे लक्षात येते. काही वेळा स्लिपचे पट्टे धुवून सैल झाले असतील तर ते कपड्यातून बाहेर येतात आणि कधी कधी ते खांद्यातून खाली पडल्याचेही दिसते. त्यामुळे खरंच आवश्यकता नसेल तर स्वत:ला अशाप्रकारे एकावर एक कपडे घालून बांधून ठेऊ नका.