सुडौल बांधा हा रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असतो. अति जाड असो नाहीतर अति बारीक अशा व्यक्तींची कायमच टिंगल केली जाते. वजन कमी करणे ही जशी जाड लोकांसाठी समस्या असते तशी वजन वाढवणे ही बारीक लोकांपुढे समस्या असते. जाणून घेऊया त्यावर योग्य उपाय!
वजन वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये तसेच तुमच्या जीवनशैलीत आवश्यक बदल करणे क्रमप्राप्त ठरते. त्यासाठी कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत, कोणता व्यायाम करावा, किती झोप घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
सुका मेव्याचे सेवन :
वजन वाढवण्यासाठी सुका मेवा उपयुक्त ठरतो. सुका मेवा हे राजेशाही खाणे मानले जाते. याचा संबंध केवळ श्रीमंतीशी नाही तर तुमच्या आरोग्याशी निगडित आहे. जाड लोकांना सुका मेवा खाऊ नका सांगितले जाते तर बारीक लोकांना वजन वाढीसाठी सुका मेवा संतुलित प्रमाणात खा असे सुचवले जाते. त्यासाठी रोजच्या आहारात अक्रोड, पिस्ता, बदाम, शेंगदाणे यांसारख्या हाय-कॅलरी खाद्यपदार्थांचा समावेश करा.
आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढवा :
प्रथिनयुक्त आहार वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो. मांसाहारी लोकांना अनेक पर्याय असतात. तर शाकाहारी लोक डाळी, पनीर, सोया, हरभरा, चणे आणि दूध या माध्यमातून प्रोटीनचे प्रमाण वाढवू शकतात. प्रथिनांमुळे स्नायूंची वाढ होते, ज्यामुळे वजन वाढते आणि शरीराला ताकद मिळते....
हेल्थी फॅट वाढवा :
एवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल आणि साजूक तूप यांसारख्या हेल्दी फॅटचे सेवन करा. ते शरीराला ऊर्जा आणि वजन वाढवण्यास मदत करतात.
दर दोन तासांनी खा :
वजन वाढवण्यासाठी एकाच वेळी भरपूर न जेवता दर दोन तासांनी छोटे छोटे आहार घेता येतील. तीन मुख्य जेवणांव्यतिरिक्त, दिवसभरात दोन-तीन स्नॅक्स देखील खा. प्रोटीन शेक, पीनट बटर, सँडविच असे पदार्थ तुम्ही दर २-३ तासांनी खाऊ शकता.
द्रवयुक्त आहार घ्या :
शेक, स्मूदी किंवा फळांचे रस योग्य तऱ्हेने वजन वाढवण्यास मदत करतात. यामध्ये अधिक कॅलरीज आणि पोषक तत्वे असतात. विशेषतः दूध, दही आणि फळांच्या रसामध्ये कॅलरीज असतात, जे वजन वाढवण्यास मदत करतात.
व्यायाम करा :
वजन वाढवण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग करता येते. यामुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीराचे वजन वाढते. हलके चालणे किंवा योगासने देखील शरीर निरोगी ठेवू शकतात, परंतु अधिक कॅलरी वापरल्यानंतरच व्यायाम करा. त्यामुळे वजन वाढीस मदत होऊ शकते.
पुरेशी झोप :
प्रत्येक व्यक्तीने ७ ते ८ तास झोप घेतली तर शरीर यंत्रणा सुरळीतपणे चालण्यास मदत होते. वजन वाढवणे असो व कमी करणे असो, पुरेशी झोप असेल तर आजार जडत नाहीत आणि खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर होण्यास मदत होते.