वाढलेलं वजन कमी करत असताना नाकीनऊ येतात. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांचं वजन वाढत चाललं आहे. वेट लॉस दरम्यान व्यायाम व आहार, या मुख्य दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागते. मात्र, डाएटमध्ये काय खावं काय टाळावं, या बाबतीत अनेक प्रश्न मनात उद्भवतात. आपण वेट लॉस करत असताना चहा, कॉफी टाळतो व दुधाचे सेवन करायला सुरुवात करतो.
दूधआरोग्यदायी आहे, यात शंका नाही. परंतु, त्यात चरबी देखील असते. जे वजन वाढण्याशी संबंधित मॅक्रोन्यूट्रिएंट आहे. १ कप दुधात सुमारे ५ ग्रॅम चरबी आणि १५२ कॅलरीज असतात. त्यामुळे दूध प्यावं किंवा टाळावं, याबाबत मनात प्रश्न येणं साहजिक आहे.
यासंदर्भात, इट युअर केक, लूज युअर वेटचे लेखक, हॉलिस्टिक हेल्थ कोच अजहर अली सैय्यद यांनी नवभारत टाईम्स या वेबसाईटला माहिती देताना सांगितलं की, ''लहानपणापासून आपण दूध पीत मोठे झालो आहोत. पनीर, दही, व इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन आपण करतोच. ज्यामध्ये प्रथिने, कार्ब्स, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी१२, व्हिटॅमिन डी, रिबोफ्लेविन आणि नियासिन फॅट्स असतात. या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.''
ते पुढे म्हणतात, ''वजन कमी करण्याची प्रक्रिया ऊर्जा संतुलनावर अवलंबून असते. कोणतेही अन्न वगळणे किंवा खाणे यावर नाही. जर वजन कमी करायचे असेल तर, कॅलरीजचे सेवन कमी करा. कारण, अॅक्टिव्हिटी करून बर्न केलेल्या कॅलरीजपेक्षा जेव्हा आपण जास्त खातो, तेव्हा वजन वाढते. पण कॅलरीजचे सेवन नियंत्रणात केले तर, वजन सहज कमी होऊ लागते.
वेट लॉससाठी दुध सोडणे आवश्यक नाही
वजन कमी करत असताना कॅलरीजवर लक्ष द्यावे लागते. केवळ दुग्धजन्य पदार्थांमुळे वजन वाढत नाही. कॅलरीज बर्न करताना, त्यापेक्षा अधिक कॅलरीजचे सेवन करू नये. नियमित प्रमाणात प्रत्येक पदार्थ खा. त्यामुळे दूध, चीज, दही, पनीर या दुग्धजन्य पदार्थांना टाळू नका. यातील पौष्टीक घटक आपल्या शरीराला उर्जा देतात. दरम्यान, कॅफिनयुक्त पेय जसे की, कॉफी आणि दुधापासून तयार चहा टाळा.
लो फॅट दुधाचे करा सेवन
दूध पिऊनही आपण कॅलरीज कमी करू शकता. यासाठी फॅट फ्री किंवा लो फॅट दुधाचे सेवन करावे. त्याचबरोबर गाई-म्हशीच्या दुधाऐवजी, सोया दुधाचेही सेवन करता येईल.