डॉ. उमेश खन्ना, कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट, नेफ्रोप्लस
क्रॉनिक किडनी डिसीझ (सीकेडी) हा देशात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा असंसर्गजन्य आजार आहे. पण महिलांना होणारा सीकेडी जीवावर बेतू शकतो. महिलांच्या मृत्यूसाठी सीकेडी हे आठव्या क्रमांकाचे कारण हे तुम्हाला माहीत आहे का? कारण म्हणजे कुटुंबात कुणाला हा आजार झालेला असणं, फॅमिली हिस्ट्री असणं हेदेखील मूत्रपिंडाच्या आजाराचं एक कारण. त्यामुळे आजार न होण्यासाठी काळजी घेणं आणि झालाच तर उपचार काय करणं याची माहिती हवीच. (What are the precautions for kidney disease)
१. मूत्रपिंडाचा आजार होण्याचे मूळ कारण काय?
मधुमेह, उच्च रक्तदाब, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस (मूत्रपिंडाच्या ग्लोमेरुलर युनिट्सना सूज येणे), अनुवांशिक मूत्रपिंड आजार, पॉलिसायटिक मूत्रपिंड आजार, मूतखडा आणि मूत्रपिंडाचा कर्करोग आणि मूत्रपिंडाला वारंवार होणारा संसर्ग यासारखा मूत्रपिंडाला होणारा अडथळा यामुळे मूत्रपिंडाचे गंभीर आजार होऊ शकतात. या व्यतिरिक्त हृदयविकार, धुम्रपान, स्थूलपणा, वाढलेले वय आणि मूत्रपिंडाची सामान्य नसलेली रचना यामुळे मूत्रपिंडाचा विकार होऊ शकतो. त्याचप्रमाणे बैठी जीवनशैली, विश्रांती व व्यायामाचा अभाव, सॅच्युरेटेड आणि साठवून ठेवलेल्या पदार्तांचे सेवन अशा काही कारणांमुळे आजाराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
२. मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणं कोणती?
सर्वात पहिली बाब म्हणजे, मूत्रपिंडाचा आजार हा 'सायलेंट' आजार आहे. मूत्रपिंडाचे हळुहळू नुकसान होत असेल तर क्रोनिक किडनी डिसीझ कालानुक्रमे विकसित होतो. तो किती गंभीर स्वरुपाचा आहे यावरून मूत्रपिंडाच्या कार्यावर होणारे परिणाम ठरतात.
सीकेडीची सर्वसामान्यपणे आढळणारी काही लक्षणे : मळमळ, उलट्या, भूक मंदावणे, थकवा, अशक्तपणा, झोपेच्या समस्या, मूत्रविसर्जनाचे प्रमाण कमी किंवा जास्त होणे, मानसिक तल्लखता कमी होणे, स्नायूंमध्ये गोळे येणे, पायांना आणि घोट्याला सूज येणे, शुष्क, खाजरी त्वचा, उच्च नियंत्रण करण्यास कठीण असलेला रक्तदाब (हायपरटेन्शन), धाप लागणे, फुफ्फुसात पाणी होणे, छातीभोवती पाणी जमा झाले तर छातीत वेदना होणे.
३. हे होत असेल तर..
थकवा, पायाला व घोट्याला सूज येणे, मूत्रविसर्जन कमी होणे ही मूत्रपिंडाला इजा झाल्याची सर्वसामान्यपणे आढळणारी लक्षणे आहेत. ही लक्षणे म्हणजे तुमच्या शरीरातील मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड झाल्याची सुरुवात असू शकते.
४. काळजी काय घ्यायची?
वजन प्रमाणात राखावे. वजन वाढणं बरं नाही.
धम्रपान आणि मद्यपान टाळा.
नियमित आरोग्य तपासणी करा.
वेदनाशामक औषधांचे प्रमाण कमी करा : प्रिस्क्रिप्शन नसलेली ॲस्पिरिन, इबुप्रोफेन (ॲडव्हिल, मॉट्रिन आयबी, इत्यादी) आणि ॲसिटॅमिनोफेन (टायलेनॉल, इ.) घेताना पाकिटावरील सूचनांचे पालन करा. दीर्घकाळ खूप जास्त वेदनाशामक औषधे घेतली तर मूत्रपिंडाचा विकार होऊ शकतो.