सतत अपचन-ॲसिडिटी यांचा त्रास होणं ही आताशा एक कॉमन समस्या झाली आहे. अपचन आणि अजीर्णाचा त्रास तर अनेकांना सतत होतो. त्याचं कारणही तेच. वेळी अवेळी जेवणामुळे, चुकीच्या वेळी चुकीचं खाल्ल्यामुळे, ताण, जंक फूड खाणे आणि पिणे यामुळे पचनाचे विकार वाढले आहेत. त्यातलेच एक सतत होणारे अजीर्ण. अजीर्ण म्हणजे काय तर खाल्लेलं अन्न पचन होवून ते शरीरामध्ये शोषलं जाणं आवश्यक असतं. तसं न होता अन्न न पचलेल्या स्थितीमध्ये आतड्यांमध्ये राहतं त्यास अजीर्ण म्हणतात.अनेकदा अन्न घशाशी येतं, करपट ढेकर येतात.
अजीर्ण का होतं?
१. आहारासंबंधीचे कोणतेही नियम न पाळता सारखं खात राहाणं.
२.अती पाणी पिणं. अतीच खाणं.
३. रात्री जागरण.
४. जेवणाच्या अनियमित वेळा.
५. दिवसा झोपणं.
६. अती चिडचिड किंवा स्ट्रेस.
७. भूक लागलेली नसताना खाणं. जंक फूड अती प्रमाणात आणि सतत खाणं.
घरच्याघरी काय उपाय?
१. न खाणं, काही वेळ काहीच न खाता राहणं म्हणजे लंघन उपयाेगी पडतं. २. गरम पाणी पिणं. ३. गरम पाण्यामध्ये आलं आणि लिंबू घालून उकळून त्यामध्ये सैंधव मिठ घालून प्यावं. ४. ताकामध्ये हिंग तळून घेतल्यास, किंवा सूंठ, मिरी, पिंपळी यांचं चूर्ण ताकाबरोबर घेतल्यास त्वरीत आराम वाटतो. अन्यथा हिंगाष्टक चूर्ण ताकाबरोबर घेतल्यास चांगला फायदा होतो.
(Image ;google)
५. आलं -लिंबाचं पाचक पूर्वी सर्वाच्या घरात असायचं ते अजीर्णवरचं उत्कृष्ट औषध आहे. ६. कोकम सरबत किंवा डाळींबाचा रस यामध्ये सैंधव मीठ, जीरेपूड, मीरीपूड टाकून घेतल्यास उत्तम फरक पडतो. ७. सुंठीची कढी करून प्यायल्यास खूप फरक पडतो. ८. आणि सर्वात महत्त्वाचं खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणं, तोंडावर नियंत्रण असणं आणि जंकफूड न खाणं हे उत्तम.