Join us   

करीना कपूरच्या वडिलांना झालेला आजार नेमका काय आहे? तो कुणाला होतो आणि कशाने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2022 2:24 PM

काय आहे उतारवयात होणारा हा आजार? त्याची लक्षणे, कारणे यांविषयी...

ठळक मुद्दे प्रत्येक रुग्णात वेगवेगळी लक्षणे असल्याने त्यानुसार औषधोपचार केले जातात. सुरुवातीला तात्पुरती स्मरणशक्ती कमी होते व नंतर हळूहळू आजार वाढत जातो.

वय वाढलं की व्यक्तीच्या शरीरामध्ये ज्याप्रमाणे बदल होतात त्याचप्रमाणे मेंदूमध्येही काही बदल होतात. आपले शरीर एका विशिष्ट वयानंतर थकते, सांधे दुखायला लागतात, हालचाली मंदावतात त्याचप्रमाणे आपला मेंदूही इतके वर्ष काम केल्याने थकतो. उतारवयात होणारा एक गंभीर आजार म्हणजे डिमेन्शिया. यालाच मराठीत स्मृतीभ्रंश किंवा विसरभोळेपणा असे म्हटले जाते. आपल्याशी कालपर्यंत व्यवस्थित बोलणारी व्यक्ती एकाएकी आपलं नाव विसरते. २ मिनीटांपूर्वी आपण सांगितलेली एखादी गोष्टही या व्यक्तीला व्यवस्थित आठवत नाही. असा हा काहीसा वेगळाच आजार प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर हिचे वडील आणि अभिनेते रणधीर कपूर यांना झाला आहे. 

अभिनेता रणबीर कपूर याने नुकत्याच एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली. आपले भाऊ ऋषी कपूर या जगात नाहीत हे त्यांना लक्षात येत नाही. नुकताच त्यांनी ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट शर्माजी नमकीन पाहिला आणि ऋषी कुठे आहे असे विचारले असेही रणबीर म्हणाला. आता स्मृतीभ्रंशाचा हा आजार नेमका काय आहे, तो उतारवयातच का होतो, त्याची कारणे आणि उपचार यांविषयी समजून घेऊया.  

(Image : Google)

काय असतो हा आजार? 

डिमेन्शिया/ Dementia ही एक मेंटल स्टेज आहे असे आपण म्हणू शकतो. ही समस्या अल्झायमर/ टेंशन/ डिप्रेशन/ स्ट्रेस किंवा कोणत्याही कारणामुळे मेंदूवर भयंकर परिणाम झाल्याने उद्भवते. अल्झायमर हे डिमेन्शिया किंवा स्मृतीभ्रंशाचे मूळ कारण आहे असे मानले जाते. डिमेन्शिया संदर्भामध्ये समाजामध्ये जागरुकता नसल्यामुळे या समस्येमधून बाहेर पडणे कठीण होऊन बसते. डिमेन्शिया ही गोष्टी विसरणे या साध्या घटकापेक्षा जास्त मोठी समस्या आहे. ह्याची असंख्य चिंताजनक लक्षणे असू शकतात. या लक्षणामुळे रुग्णाच्या दैनंदिन आयुष्यावर फरक पडत जातो. जसजसे वय वाढत जाते, तसे डिमेंशियाची समस्या वाढत जात असते. वयानुसार ही समस्या बळावते असे आपण म्हणू शकतो. बहुतांश लोक हे डिमेन्शिया वेडेपणा किंवा मतिमंदपणा आहे असे समजतात, पण ते चुकीचे आहे. 

लक्षणे   

१. कोणतीही गोष्ट सतत बोलणे, पुनरावृत्ती करणे.  २. एखादी गोष्ट समजण्यामध्ये अडथळा निर्माण होणे. ३. समाजामध्ये वावरताना विचित्र वागणे, लोकांशी नीट न बोलणे. असभ्य भाषेचा वापर करणे, शिव्या देणे, अश्र्लील कृती करणे. ४. एखादी गोष्ट कितीही प्रयत्न केला तरी न आठवणे, लक्षात ठेवता न येणे. ५. स्वतःच्या विश्वामध्ये रममाण असणे, इतरांशी बोलणे सोडून देणे. ६. विनाकारण घाबरणे, दुसर्‍यांवर रागावणे, ओरडणे इ. ७. लोकांची नावे लक्षात ठेवणे कठीण वाटते. छोट्या-छोट्या समस्यांवर समाधान शोधणे अशक्य वाटणे. ८. चालू दिवस, तारीख, महिना किंवा वर्ष विसरून जाणे. ९. कोणत्याही चित्राकडे पाहून ते समजण्यामध्ये समस्या वाटणे. १०. चुकीचा शब्द बोलणे किंवा लिहणे, शब्दांचे अर्थ नीट न समजण्यामध्ये अडचण वाटणे.

आजाराची कारणे

स्मृतिभ्रंश झालेल्या ७० टक्के रुग्णांमध्ये अल्झायमर्सचा आजार दिसून येतो. हा आजार साधारणत: वयाच्या पासष्टीनंतर दिसून येतो. परंतु ५ टक्के रुग्णांमध्ये ४०-५०व्या वर्षीसुद्धा आढळतो. अल्झायमर्सच्या आजारात मेंदू हळूहळू अकार्यक्षम होतो. मेंदूत सदोष प्रथिने वाढत जातात व रक्तप्रवाहास अडथळा निर्माण करतात. आजाराची लक्षणे प्रत्येक व्यक्तीत एकसारखी नसतात. सुरुवातीला तात्पुरती स्मरणशक्ती कमी होते व नंतर हळूहळू आजार वाढत जातो.

(Image : Google)

उपचार 

या आजारावर अद्याप ठोस असा उपचार सापडलेला नाही. त्यामुळे एकदा हा आजार झाला की शेवटपर्यंत व्यक्ती त्या समस्याने ग्रासलेली राहते. नियमित कार्य करु न शकल्याने कुटुंबियांवरही ताण येतो. प्रत्येक रुग्णात वेगवेगळी लक्षणे असल्याने त्यानुसार औषधोपचार केले जातात. मात्र अद्यापही ठोस असे औषधोपचार उपलब्ध नाहीत. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समानसिक आरोग्य