जेवण म्हटलं की त्यात पोळी-भाजी, भात-आमटी, कोशिंबीर, चटणी असं सगळं ओघानेच आलं. ऑफीसला जात असलो तर आपण डब्यात फक्त पोळी-भाजी आणि चटणी किंवा सॅलेड नेतो. पण जेवायला घरात असू तर भात असल्याशिवाय आपले जेवण पूर्णच होत नाही. गरमागरम भात समोर आला की आपला कंट्रोल राहत नाही. रात्रीच्या जेवणात तर आपल्याकडे आवर्जून भात-आमटी, खिचडी, पुलाव असं काही ना काही करतो. विकेंडलाही आपण आवर्जून भाताचा एखादा प्रकार करतो. मसालेभात, भाज्या घातलेला पुलाव, मसूर भात, पालक भात, दही भात असे भाताचे असंख्य प्रकार आपण ट्राय करतो (What Happens When we Dont Eat Rice for Month).
मात्र कधी वजन कमी करायचं म्हणून किंवा कधी झोप येऊ नये म्हणून भात खाणं आवर्जून टाळलं जातं. शुगर वाढू नये म्हणूनही भात खाऊ नये असे सांगितले जाते. बरेच जण या भितीने भातावर बहिष्कारही टाकतात. अनेकांना भात आवडत असून भात खाता येत नाही म्हणून इच्छा मारावी लागते. स्टार्च हा भातातील मुख्य घटक असतो. याशिवायही भातात शरीराला आवश्यक असे बरेच घटक असतात पण शुगर वाढू नये आणि वजन वाढू नये म्हणून तुम्हीही भात खाणे सोडले असेल तर त्याचा शरीरावर काय परीणाम होतो याविषयी आहारतज्ज्ञ प्रिया भारमा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात.
१. भात खाणे महिनाभरासाठी बंद केल्याने वजन कमी होण्याची शक्यता असते याचे महत्त्वाचे कारण शरीरात जाणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण कमी होते.
२. तसेच भात खाण्यास ब्रेक घेतल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात येण्यास मदत होते. मात्र हे फक्त त्या महिन्याभरासाठीच मर्यादित राहते. पुन्हा भात खायला सुरुवात केल्यावर रक्तातील साखर पुन्हा वाढते.
३. हे सगळे खरे असले तरी आपल्याला भात खायचा असेल तर तो किती खायला हवा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर शिजवलेला एक वाटीभर भात योग्य पद्धतीने खाल्ला तर त्याने शरीराला कोणताही अपाय होत नाही हे लक्षात घ्यायला हवे.
४. भातामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते त्यामुळे आपली पचनक्रिया सुरळीत होण्यास आणि पोट साफ होण्यास मदत होते. मात्र भात पूर्ण बंद केला तर पचनावर त्याचा वाईट परीणाम होतो. भातामध्ये कार्बोहायड्रेटस, बी व्हिटॅमिन, खनिजे असतात.