हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बीबरने (Justin Beiber) अलीकडेच आपला एक व्हि़डिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने आपल्याला रामसे हंट सिंड्रोम (Ramsay Hunt syndrome) हा आजार झाल्याचे सांगितले आहे. आपल्या अतिशय उत्तम अशा आवाजाने जगभरातील रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या जस्टीनला हा आजार झाल्याचे ऐकताच त्याच्या चाहत्यांच्या काळजात धस्स झाले आहे. जस्टीटनने ट्विट करून त्याच्या अर्ध्या चेहऱ्याला अर्धांगवायू झाल्याचे म्हटले आहे. आपण आजारातून लवकर बरे व्हावे यासाठी त्याने चाहत्यांना प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. या गंभीर आजारामुळे बीबरने तत्काळ सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, रामसे हंट सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल आजार आहे. या आजाराने व्यक्तीला नेमके काय होते, त्याचा कोणत्या अवयवांवर परिणाम होतो आणि याची लक्षणे कोणती हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला नेमका कुठे आणि काय त्रास झाला आहे याबाबत जस्टीनने स्पष्टीकरण दिले आहे. मी अचानक कार्यक्रम रद्द केले म्हणून अनेक जण माझ्यावर नाराज आहेत मात्र अशा परिस्थितीत मी सादरीकरण करु शकत नाही असे त्याने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. जवळपास ३ मिनीटांचा हा व्हिडिओ आतापर्यंत ४ कोटींहून अधिक जणांनी पाहिला असून अनेकांनी त्याला या आजारातून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हा आजार कशामुळे होतो?
वारिसेला झॉस्टर म्हणजेच व्हीझेडव्ही या विषाणूमुळे रामसे हंट सिंड्रोम हा आजार होतो. याच विषाणूमुळे लहान मुलांना कांजिण्या होतात. तर मोठ्यांना या विषाणूची बाधा झाली तर त्वचेवर चट्टे उठण्याची समस्या उद्भवते. या संसर्गात कान, चेहरा आणि तोंड यांच्याभोती पुरळ उठल्याने रुग्णाला अस्वस्थ होते.
आजाराची लक्षणे काय?
१. कानात वेदना होणे हे या आजाराचे मुख्य लक्षण आहे.
२. चेहरा किंवा त्वचेसोबतच या आजारामध्ये कानाचा पडदा, कानातल्या पेशी, जीभ यांवरही पुरळ उठते.
३. एका बाजूने ऐकायला न येणे हे या आजाराचे मुख्य लक्षण आहे.
४. यामध्ये रुग्णाला चक्कर आल्यासारखे वाटते आणि गरगरते.
५. चेहऱ्याच्या एकाच बाजूला सूज आल्यासारखे होते.
आजाराचे गांभीर्य किती ?
१. हा विषाणू डोक्यातील मज्जातंतूंना इजा पोहचवतो, त्यामुळे चेहऱ्याला लकवा येतो.
२. या आजारात साधारणपणे डावी बाजू पूर्णपणे बधीर होते.
३. कानाला इजा होऊन बहिरेपणा येण्याचीही शक्यता असते.
४. आजारावर वेळीच उपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.
५. मात्र उपचारांना वेळ लावल्यास आजार नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असते. कायमचा बहिरेपणा येणे, चेहऱ्याला लकवा आल्याने चेहऱ्याचा आकार बदलणे असे परिणाम दिर्घकाळ राहू शकतात.