Join us   

सकाळच्या घाईत नाश्ताच करायला वेळ नाही? तज्ज्ञ सांगतात, नाश्ता करण्याची योग्य वेळ; ती चुकली की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2024 3:17 PM

what is the right time for breakfast : नाश्ताच न करणे किंवा खूप उशीरा करणे कितपत बरोबर आहे हे समजून घ्यायला हवे.

नाश्ता हा आपल्या दिवसभराच्या आहारातील सगळ्यात पहिला आहार असतो. हा आहार पोटभरीचा आणि पौष्टीक असावा असं आपण नेहमी ऐकतो. त्यानुसार नाश्त्याला प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स देणारे पदार्थ खावेत असे आवर्जून सांगितले जाते. काहीजण सकाळच्या वेळी घरातून बाहेर पडताना पोटभर खाऊनच बाहेर पडतात पण बरेचदा महिला मात्र घाईगडबडीत नाश्ता न करता झटपट चहा पिऊन बाहेर पडतात ( is the right time for breakfast).

ऑफीसला पोहोचलो की खाऊ असं म्हणून डबा घेतात पण प्रवास, ऑफीसला गेल्यावर कामाची असणारी घाई या सगळ्यात हा नाश्ता करायचा राहतो. मात्र असे करणे आरोग्यासाठी चांगले असते का, त्यामुळे काही त्रास होऊ शकतो का या सगळ्या गोष्टींची योग्य ती माहिती घ्यायला हवी. सकाळचे पहिले खाणे म्हणजेच नाश्ता हा राजाप्रमाणे म्हणजे पोटभर करावा असे सांगितले जाते. मग डाएटचे फॅड, वजन कमी करण्याची पद्धत किंवा आणखी काही कारणाने नाश्ताच न करणे किंवा खूप उशीरा करणे कितपत बरोबर आहे हे समजून घ्यायला हवे . 

सकाळी नाश्ताच केला नाही तर नेमकं काय होतं?

आपण रात्री जेवतो त्यानंतर सकाळपर्यंत साधारण ९-१० तासांचा कालावधी गेलेला असतो. झोपेत आपली एनर्जी खर्ची होत नाही असं आपल्याला वाटतं. मात्र झोपेत आपल्या मेंदूचे कार्य सुरू असल्याने आणि इतरही शरीराच्या आतील क्रिया सुरू असल्याने शक्ती खर्ची होत असते. तसेच सकाळी उठल्यावर पोट नीट साफ झाले तर आपल्याला नैसर्गिकपणे भूक लागायला हवी. पण तसे झाले नाही तर आपल्या पचनक्रियेत आणि यकृतात काही बिघाड तर नाही ना हे तपासून पाहायला हवे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सकाळी रक्तातील साखर कमी झालेली असते त्यामुळे भूक लागणे आणि आपण आरोग्यदायी असे काही खाणे म्हणजेच नाश्ता करणे अतिशय गरजेचे असते. पण हा नाश्ता आपण केला नाही तर रक्तातील साखर कमी होते, अॅसिडीटीसारखे त्रास होतात, थकवा येतो. काहीवेळा पोटाच्या, पचनाच्या तक्रारीही जास्त प्रमाणात वाढतात.  

नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती?

सकाळी उठल्यावर भूक लागणे अतिशय सामान्य आहे. पचनशक्ती चांगली असेल तर नैसर्गिकपणे अशी भूक लागते. पण तसे नसेल तर मात्र आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यायला हवे. तज्ज्ञांच्या मते सकाळी झोपेतून उठल्यावर १ तासाच्या आत आपण काहीतरी आरोग्यदायी खायला हवे. आपल्याकडे बहुतांश लोक सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी चहा घेतात. जे चहा घेत नाहीत ते पाणी पितात आणि सकाळच्या कामांना सुरुवात करतात. महिला वर्गाला तर समोर कामं दिसत असल्याने त्या घाईने आधी कामांनाच लागतात. 

पण उठल्यावर सगळ्यात आधी नाश्त्याची तयारी करणं आणि १ तासाच्या आत खाणं जास्त महत्त्वाचं असतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दिवसभराचा चयापचय वाढवण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी चांगली ठेवण्यासाठी नाश्ता करणे अतिशय उपयुक्त असते. यामध्ये प्रोटीन म्हणजेच अंडी, दूध, पनीर, दही, डाळी, कडधान्य यांचा समावेश हवा. त्याशिवाय फळं, सुकामेवा, तूप, भाज्या यांचाही नाश्त्यामध्ये समावेश असेल तर आरोग्य चांगले राहायला मदत होते.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनालाइफस्टाइल