Join us   

मोड आलेली कडधान्य खाता, पण प्रोटीन मिळतं का? ७ गोष्टी विसरु नका, तरच मिळेल भरपूर प्रोटीन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2024 6:18 PM

What is the right way to eat sprouts : How to Consume SPROUTS : The Best Way To Eat Sprouts : कडधान्य खाताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्याचा आरोग्याला त्रास न होता कडधान्ये खाण्याचे योग्य फायदे मिळतील.

मोड आलेली कडधान्ये खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले असते. आपण बहुतेकवेळा सकाळचा नाश्ता किंवा दुपारच्या जेवणात मोड आलेली कडधान्ये खातो. चांगल्या आरोग्यासाठी आपल्या रोजच्या डाएटमध्ये कडधान्यांचा समावेश असावा असे सांगितले जाते. कडधान्ये प्रोटिन्स आणि इतर महत्वाच्या पोषक घटकांचा उत्तम स्रोत असल्याने ही कडधान्ये खाल्ली जातात. मोड आलेली कडधान्ये शरीराला पोषण देणारी असतात. वजन कमी करण्यासाठी, रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी, शरीराची झीज भरुन काढण्यासाठी मोड आलेली कडधान्य खाण्याला खूप महत्व दिले जाते. नुसत्या कडधान्यांपेक्षा मोड आलेली कडधान्ये आरोग्यासाठी अधिक पौष्टिक मानली जातात(The Best Way To Eat Sprouts).

कडधान्य खाण्याचा सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे त्यानं मोड आणून खाणं. कडधान्यांना मोड येतात तेव्हा त्यातील पोषक तत्वांच्या घटकांची फार मोठ्या प्रमाणात वाढ होते. कडधान्य खाण्याने जसा आपल्या आरोग्याला चांगला फायदा होतो तसेच त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. काहीवेळा कडधान्य खाल्ल्याने पोटात गॅस, ब्लोटिंग, अ‍ॅसिसिडिटी, अपचन सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे कडधान्य खाताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून काळजी घेतली पाहिजे. कडधान्य खाताना काही साध्यासोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्याचा आरोग्याला त्रास न होता कडधान्ये खाण्याचे योग्य फायदे मिळतील(What is the right way to eat sprouts).

कडधान्य खाताना लक्षात ठेवा... 

१. मोड आलेली कडधान्ये पचायला थोडी जड असतात. यामुळे आपल्या पोटात गॅस तयार होऊ शकतो. कच्ची कडधान्ये खाल्ल्याने पोटात गॅस, ब्लोटिंग, अ‍ॅसिसिडिटी, अपचन सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे कच्ची कडधान्ये कधीच खाऊ नयेत. कडधान्ये नेहमी उकडून किंवा किंवा थोड्याशा तेलात फ्राय करुनच खावीत.  

२. कडधान्ये आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळाच खावीत. 

३. बारीक मोड आलेली कडधान्ये खाण्यास योग्य असतात. कडधान्यांना फार मोठे मोड आणू नये. बेताचेच मोड आणावेत. अगदी लहानही नको पण अगदी मोठेही नको. 

मोड आलेली कच्ची कडधान्य खाल्ल्याने होतोय ब्लोटिंगचा त्रास ? बघा कडधान्य खाण्याची योग्य पद्धत... 

४. मोड आलेली कडधान्ये शक्यतो कच्ची खाऊ नयेत. यामुळे बॅक्टेरियल इंन्फेक्शन आणि पोटाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मोड आलेली कडधान्ये चिमूटभर हळद घालून उकडवून खावीत. यामुळे कडधान्यांचे पचन चांगले होते. कडधान्य प्रेशर कुकरमध्ये घालून किमान त्यांना एक वाफ आणावी आणि मगच ती खावीत यामुळे कडधान्य बाधत नाहीत. कडधान्य पचायला सोपे होण्यासाठी तसेच त्यात जर काही सूक्ष्म जिवाणू असतील तर ते काढून टाकण्यासाठी कडधान्य शिजवली तर उत्तम. 

५. मोड आलेली कडधान्य शक्यतो सकाळी नाश्त्याला आणि दुपारच्या जेवणात खावीत. कारण यातील प्रोटिन्स पचवणे हे शरीरासाठी कितीही सोपे असते असं म्हटलं तरीही ते पचवण्यासाठी अवधी लागतोच. त्यामुळे कडधान्ये सकाळी किंवा दुपारी खावीत, रात्री कडधान्ये खाणे टाळावे. 

फराह खान करते तशी करा क्रिस्पी भेंडी, अजिबात बुळबुळीत न होणारी भेंडीची भाजी...

६. जे नियमित एक्सरसाइज व कष्टाची कामे करतात त्यांची पचनशक्ती खूप चांगली असते अशा व्यक्तींनी मोड आलेली कडधान्ये खावीत. 

७ पोटाचे विकार असणारे, पचनशक्ती कमी असणारे, बैठे काम करणारे अशा व्यक्तींनी मोड आलेली कडधान्ये कमी प्रमाणात खावीत.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न