Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > झोप आणि ‘लस’ यांचा काय संबंध असतो? झोप कमी तर असर कमी..

झोप आणि ‘लस’ यांचा काय संबंध असतो? झोप कमी तर असर कमी..

‘लस’ घेण्याचा आणि ‘झोपेचा’ काही संबंध असतो, झोप कमी झाली तर लशीचा असर कमी होतो असं अभ्यास सांगतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 01:43 PM2021-07-29T13:43:59+5:302021-07-29T13:49:29+5:30

‘लस’ घेण्याचा आणि ‘झोपेचा’ काही संबंध असतो, झोप कमी झाली तर लशीचा असर कमी होतो असं अभ्यास सांगतात.

What is the relationship between sleep and vaccines? sleep affects potency of vaccines | झोप आणि ‘लस’ यांचा काय संबंध असतो? झोप कमी तर असर कमी..

झोप आणि ‘लस’ यांचा काय संबंध असतो? झोप कमी तर असर कमी..

Highlightsएक भयंकर निद्राविकार आपल्या समाजात प्रचलित आहे : ‘घोरणे आणि स्लीप अ‍ॅप्नीया’!

- डॉ. अभिजित देशपांडे

आपली झोप ही वेळेचा अपव्यय करणारी, निष्क्रिय अवस्था नाही. पुरेशी झोप ही आरोग्याकरिता आवश्यक आहे. आज झोपेचा लसीकरणावर होणारा परिणाम अभ्यासणारे दोन प्रयोग पाहू. जर्मनीमधील ल्युबेक विश्वविद्यालयात २७ तरुणांना काविळीची लस (Hepatitis A) देण्यात आली. लस देण्याअगोदर ६ आठवडे या सर्वांना नियमित झोप देण्यात आली. लस दिल्यानंतर त्यांची विभागणी करून पहिल्या गटाला नियमित झोप घेऊ दिली गेली, तर दुसऱ्या गटातील व्यक्तींना अजिबात झोपू दिले नाही. लस दिल्यानंतर T- memory cells उद्दीपित होऊन त्यांची संख्या वाढू लागते. जितकी संख्या जास्ती तितकी प्रतिकाराची क्षमता वाढते. या प्रयोगात जी मंडळी झोपली नव्हती त्यांच्या T- memory cells ची संख्या ६० टक्क्यांनी कमी होती. १२ आठवड्यानंतर केलेल्या रक्तचाचणीमध्ये परत हेच आढळले.

२००२ साली स्पिगेल या तज्ज्ञाने फ्लु (Influenza) ची लस आणि झोपेची कमतरता यावर संशोधन केले. ज्या व्यक्ती लस घेण्याअगोदर निदान एक आठवडा जरुरीपेक्षा कमी झोप घेतात त्या व्यक्तींमध्ये ही लस कमी परिणामकारक ठरते असे आढळून आले. याच संशोधनावर आधारित प्रयोग २०१७ साली करण्यात आला. यात ६५ तरुण निरोगी पण निद्रानाश (Insomnia) असणाऱ्या व्यक्तींची तुलना त्याच वयोगटातील निरोगी पण व्यवस्थित झोप असणाऱ्या व्यक्तींशी करण्यात आली. ‘फ्लु’ची लस दिल्यानंतर येणारी प्रतिकारशक्ती निद्रानाश असलेल्यांमध्ये कमी होती. विशेष म्हणजे निद्रानाशाची तीव्रता जितकी अधिक, तितकी प्रतिकारशक्ती कमी हेदेखील आढळले. निद्रानाशा (Insomnia)प्रमाणेच आणखीन एक भयंकर निद्राविकार आपल्या समाजात प्रचलित आहे : ‘घोरणे आणि स्लीप अ‍ॅप्नीया’! या विकारामध्ये झोपेची प्रत खालावते आणि त्या व्यक्तीला त्याचा पत्ताच नसतो!
नुकतेच ३ महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेले संशोधन. यात कोविड रुग्णांमध्ये ज्यांना निद्रानाश अथवा ‘स्लीप अ‍ॅप्नीया’ (घोरणे) होता त्यांना मोठ्या प्रमाणावर इस्पितळात दाखल करण्याची वेळ आल्याचे या संशोधनात दिसले. या संशोधनात सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी अधोरेखित केलेली बाब म्हणजे ‘निद्रानाश अथवा 'स्लीप अ‍ॅप्नीया’ असणाऱ्यांमध्ये कोरोना लसीचा परिणाम कमी होण्याची दाट शक्यता आहे!

(लेखक निद्राविकार तज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: What is the relationship between sleep and vaccines? sleep affects potency of vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.