पाठदुखी हा अलीकडच्या काळातील एक सर्वसामान्य आजार. स्त्री असो अथवा पुरूष, तरूण असो अथवा वृद्ध, जो कुणी दुचाकी चालवतो, त्यातल्या ८० टक्के लोकांना पाठदुखीचा त्रास होतो. दुचाकीमुळे जर पाठदुखी होत असेल, तर त्याचे एक प्रमुख कारण आहे रस्त्यांवरील खड्डे. खराब रस्ते असतील, तर नक्कीच गाडी चालविताना खूप त्रास होतो आणि खड्डा येताच संपूर्ण शरीरालाच जोरदार दणका बसतो. यासोबतच दुचाकीमुळे पाठदुखी होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे चुकीचे पोश्चर.
जर टू व्हीलरवर आपण योग्य पद्धतीने बसलो नाही, तरीही आपल्याला पाठ आणि कंबरदुखीचा भयानक त्रास होऊ शकतो. बऱ्याचदा आपण गाडीवर अवघडून बसलो आहोत, हे देखील आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे पाठदुखीचा सगळा दोष आपण सरळ खराब रस्त्यांना देतो आणि मोकळे होतो. त्यामुळे टू व्हीलर चालविताना गाडीवर बसण्याची योग्य पद्धत कशी आहे, गाडी चालविताना कोणत्या गोष्टी कराव्या, कोणत्या गोष्टी टाळाव्या, हे एकदा व्यवस्थित लक्षात घेणे गरजेचे आहे. हे नियम फॉलो केल्यास पाठदुखीचा त्रास बऱ्यापैकी कमी होऊ शकतो.
पाठदुखीचा त्रास टाळायचा असेल तर.....
१. पाठदुखीचा त्रास टाळायचा असेल तर गाडीवर ताठ बसा.
२. गाडी चालवताना चेहरा नेहमी सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा.
३. चुकीचे किंवा वजनदार हेल्मेट हे देखील पाठ आणि मानदुखीचे एक कारण असू शकते. हेल्मेट खूप वजनदार असेल, तर त्यामुळे मान दुखू शकते. म्हणून तुमचे हेल्मेट उत्तम क्वॉलिटीचे असणे खूप गरजेचे आहे.
४. गाडी चालवताना दोन्ही पायांमध्ये योग्य अंतर असू द्या. जेणेकरून शरीराचा भार पायांवर व्यवस्थितपणे पेलल्या जाईल.
५. हँडलवर ठेवलेले आपले दोन्ही हात कोपऱ्यांमध्ये किंचित वाकलेले असावेत. ज्यामुळे बसणाऱ्या धक्क्यांची तिव्रता कमी होते आणि मणक्यांवर जोर येत नाही.
६. खड्ड्यांच्या रस्त्यांवर गाडी चालवताना हँडलबार आपण खूप जोरात धरून ठेवतो. तेवढा जोर लावू नका. यामुळे विनाकारण हात, मान आणि पाठीवर ताण येतो आणि पाठ दुखू लागते.
हे ही लक्षात ठेवा
आपली उंची, जाडी, शारीरिक ठेवण यानुसार प्रत्येक गाडीचे मॉडेल आपल्यासाठी आरामदायी असेलच असे नसते. म्हणून आपल्या गरजेनुसार आण आपल्याला शारीरिकदृष्ट्या झेपेल, अशीच गाडी आपण निवडली पाहिजे. म्हणून जर नवी गाडी घेत असाल, तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्हाला नवी गाडी घ्यायची असेल, तर किमान टेस्ट ड्राईव्हसाठी अर्धातास गाडी चालवू द्यावी, ही विनंती करावी. अर्ध्या तासात आपल्याला पाठीचा त्रास होत आहे की नाही, हे लक्षात येईल. मग त्यानुसार गाडी घ्यायची की नाही हे ठरवावे.