Join us   

सतत छळणाऱ्या पाठदुखीचं करायचं तरी काय? डॉक्टरांकडे जा, आणि सोबत करा घरच्याघरी 7 उपाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 3:50 PM

पाठ दुखीच्या वेदना घेऊन ना काम नीट होतं ना आराम;म्हणूनच यावर योग्य ते उपचार करणं आवश्यक आहेत.  पाठदुखीवर सहज करता येतील असे घरगुती उपायही आहेत.

ठळक मुद्दे पाठीच्या दुखण्यावर दुर्लक्ष केल्यानं दुखणं वाढतं आणि पसरतं देखील.बसण्या उठण्याच्या पध्दतीत सुधारणा केली तरी पाठीच्या दुखण्यावर आराम मिळतो.शरीराला योग्य व्यायाम मिळाला नाही तर पाठदुखीसारख्या समस्या उद्भवतात.

एकीकडे धावपळीची दिनचर्या आणि दुसरीकडे तासनतास बसून काम. ना दिवसभरात व्यायामाला वेळ ना थोडासा आराम करायलाही. अशी टोकाची जीवनशैली अनेक आजारांना कारणीभूत ठरते. पाठदुखी, कंबरदुखी हे दुखणं तर खास चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून ओळखलं जातं. बठता, उठता पाठ दुखणं, झोपल्यावर पाठही टेकवू नये इतक्या पाठीत वेदना होणं असे त्रास अनेकांना जाणवतात.

Image: Google

साधी पाठदुखीच तर आहे  म्हणून कितीही त्रास होत असला तरी दुर्लक्ष केलं जातं. पण पाठीच्या दुखण्यावर दुर्लक्ष केल्यानं दुखणं वाढतं आणि पसरतं देखील. पाठ हा शरीराचा मध्यवर्ती अवयव असून हालचालींच्या बाबतीत महत्वाचा आहे. अशा वेळेस पाठ दुखीच्या वेदना घेऊन ना काम नीट होतं ना आराम;म्हणूनच यावर योग्य ते उपचार करणं आवश्यक आहे. पाठदुखीवर सहज करता येतील असे घरगुती उपायही आहेत. 

Image: Google

पाठदुखीने हैराण असाल तर..

1. बर्फामुळे वेदना शमतात. बर्फ रुमालात गुंडाळून पाठीवर ज्या ठिकाणी वेदना होतात तिथे 5-10 मिनिटं फिरवावा. दिवसातून दोन-तीन वेळा हा उपाय केल्यास पाठीच्या वेदना कमी होतात.

2. बसण्या उठण्याच्या , चालण्याच्या, उभे राहाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीराची ठेवण सदोष होते. वाकून, खांदे झुकवून चालणं, वाकडं उभं राहाणं, पाठीला वाक देऊन बसणं यामुळे पाठीचं दुखणं उद्भवतं. केवळ बसण्या उठण्याच्या पध्दतीत सुधारणा केली तरी पाठीच्या दुखण्यावर आराम मिळतो. पाठीचं दुखणं कमी करण्यासाठी बसण्याची योग्य पध्दत कोणती यावर तज्ज्ञ म्हणतात बसताना ताठ बसावं, पाठीला आराम हवा असल्यास पाठ टेकून पण ताठ बसावं. खुर्चीवर, सोफ्यावर बसलेले असल्यास पाय जमिनीवर व्यवस्थित टेकलेले हवेत. झोपतानाही पाठीवर झोपण्याचा प्रयत्न करावा. 

3. लसणाचं तेल लावल्यास पाठीच्या दुखण्यावर आराम मिळतो. लसणाचं तेल करण्यासाठी  भांड्यात खोबऱ्याचं/ मोहरीचं किंवा तिळाचं तेल घ्यावं. मंद आचेवर तेल गरम करावं.  तेल गरम झालं की त्यात 8 ते 10 लसणाच्या कळ्या घालाव्यात. लसूण सोनेरी रंगावर तळला गेला की गॅस बंद करावा. तेल गाळून घ्यावं. ते सामान्य तापमानाला आलं की मग या तेलानं पाठीचा मसाज करावा.  हे तेल  लावून मसाज केला की काही वेळ तेल पाठीत मुरु द्यावं आणि नंतर गरम पाण्यानं आंघोळ करावी. 

Image: Google

4. शरीराला योग्य व्यायाम मिळाला नाही तर पाठदुखीसारख्या समस्या उद्भवतात. पाठ दुखते याचा अर्थ पाठीच्या स्नायुंवर ताण आलेला असतो. हा ताण घालवण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक असतं. पाठीचे स्नायुंवर आलेला ताण घालवण्यासाठी पाठ आणि पोटाचे व्यायाम नियमित करायला हवेत असं तज्ज्ञ सांगतात. 

5. आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात इप्सम साॅल्ट टाकावं. हे मीठ पाण्यात् लगेच विरघळतं. या पाण्यानं आंघोळ केल्यास पाठीला दीर्घ काळ आराम  मिळतो.

Image: Google

6.  पाठीचं दुखणं नेहमीचंच असं म्हणून दुर्लक्ष न करता ते घालवण्यासाठी पाठीला नियमित मसाज करायला हवा. खोबरेल/तीळ/ मोहरीचं तेल कोमट करुन तेलानं किंवा पाठ दुखीवरच्या औषधी मलमानंही रोज हळूवार मसाज केल्यास पाठीच्या दुखण्यावर आराम मिळतो. 

7.पाठदुखीवर जसे बाह्य उपचार महत्वाचे असतात तसेच पोटातूनही उपचार करता येतात. यासाठी दूधात हळद आणि मध घालून पिल्यास पाठीचं दुखणं कमी होतं. या उपायानं केवळ पाठीच्या दुखण्यावर आराम मिळतो असं नाही तर शरीरात इतर ठिकाणच्या वेदनांवरही आराम मिळतो. 

 

टॅग्स : हेल्थ टिप्सपाठीचे दुखणे उपायहोम रेमेडी