Join us   

चेहऱ्यावर भरमसाठ पिंपल्स आले, तुमचं पोट तर बिघडलेलं नाही? पाहा पिंपल्स येण्याची ३ कारणं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2024 3:38 PM

What Your Pimples Are Trying To Tell You : बिघडलेलं पचन, श्वसनाचे आजार यामुळेही पिंपल्स येतात, चेहऱ्यासोबत तब्येतीकडेही पाहा..

आजकालच्या खराब जीवनशैलीमुळे, शिवाय खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही स्किन खराब होते (Health Care Tips). चेहऱ्यावर मुरुमांचे डाग, पिंपल्स, पिग्मेण्टेशन, लहान पुरळ, यामुळे स्किन आणखीन खराब होते (Skin Care Tips). ब्यूटी प्रॉडक्ट्स किंवा औषध घेतल्यानंतर, ते काही काळ निघतात. परंतु पुन्हा परत येतात. आपल्याला असे वाटते स्किनवर मुरुम आणि डाग; धूळ आणि प्रदुषणामुळे उठतात. पण असे नाही आहे. शरीरातील अवयवांना त्रास झाल्याने किंवा आतड्यांचे आरोग्य बिघडल्यानेही चेहऱ्यावर मुरूम उठू शकतात.

यासंदर्भात हेल्थ कोच गुंजन तनेजाच्या पॉडकास्टमध्ये स्किन केअर तज्ज्ञ डॉक्टर डिम्पल जंगडा सांगतात, 'आपल्या पोटात अनहेल्दी बॅक्टेरिया असतील, तर गालावर पिंपल्स येतात. जर आपण प्राणायाम करीत नसाल, श्वसनाचा त्रास असेल तर, हनुवटीच्या खालच्या बाजूस पुरळ उठू शकतात. शिवाय हार्मोनल हेल्थ बिघडल्याने हनुवटीवर पिंपल्स येतात. जर आपल्याला हृदयाच्या निगडीत समस्या असेल तर, नाकाच्या टोकावर आपल्याला पिंपल्स येऊ शकतात'(What Your Pimples Are Trying To Tell You).

चेहऱ्यावर मुरूम उठत असतील तर, त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच आपल्या आरोग्याची काळजी घ्या. काही गोष्टी खाणं टाळा. यामुळे स्किन हेल्दी होईल.

खाण्यातील ५ चुका टाळा

उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांपासून दूर राहा

उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, ज्यामुळे त्वचेवर जळजळ होऊन मुरुम येतात. व्हाईट ब्रेड, पास्ता, मॅकरोनी आणि चीज यांसारखे रिफाइंड कार्ब्स आणि फ्रोजन फूड खाणं टाळावे.

गरम पाण्यात मध, रात्री दही खाणं घातक! आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, आजारांना आमंत्रण देणं सोडा..

फ्राईड फूड खाणं टाळा

तेलात तळलेले पदार्थ खाणं टाळा. हे त्वचेच्या समस्यांचे एक प्रमुख कारण असू शकते. तळलेले पदार्थ खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य बिघडते, शिवाय बॅड कोलेस्टेरॉल वाढते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन योग्यरित्या होत नाही. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामुळे फ्राईड पदार्थ खाणं टाळावे.

अधिक दुग्धजन्य पदार्थ खाणं टाळा

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे इन्शुलिनची पातळी वाढते. ज्यामुळे चेहऱ्यावर मुरूम तयार होतात. काही अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दुधात आधीपासूनच असलेले ग्रोथ हार्मोन्स शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडवू शकतात आणि त्वचेमध्ये तेलाचे उत्पादन वाढवू शकतात.

पाम तेल तब्येतीसाठी वाईट म्हणून वापरणं टाळता? ICMR म्हणते पाम तेल फायदेशीर; पण..

गोड पदार्थ कमी खा

रिफाइंड साखर खाणं टाळा. याचा थेट दुष्परिणाम चेहऱ्यावर दिसू शकतो. यामुळे हार्मोनल लेव्हल बिघडू शकते. तर, फळांमध्ये आढळणारी नैसर्गिक साखर अशा समस्या निर्माण करू शकत नाही. परंतु, रिफाइंड साखर खाणं टाळावे.

पोट खराब म्हणजेच पिंपल्सला आमंत्रण

पोटाचे विकार वाढले की, चेहऱ्यावर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. अपचन, जुलाब किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास झाल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामुळे हेल्दी पदार्थ खा.

टॅग्स : त्वचेची काळजीब्यूटी टिप्स