शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार आणि पाणी महत्वाचे आहे. शरीराला वेळेवर अन्न आणि पाणी मिळाले की, अवयव योग्यरित्या काम करतात. ''जल हे तो जीवन है'' आपण हे वाक्य ऐकलंच असेल, मात्र पाणी पिण्याची पद्धत आणि कोणत्या वेळी पिणे हे माहित असणे गरजेचं आहे. जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये आपल्याला हे अनेक लोकांनी सांगितलं असेल. दरम्यान, जेवण्याच्या आधी, जेवताना अथवा जेवल्यानंतर नक्की कधी पाणी प्यावे असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला असेल. तसेच जेवणानंतर एक किंवा अर्ध्या तासाने पाणी प्यायल्याने खरंच फायदा होतो का? यासारख्या प्रश्नांवर शेफ रणवीर ब्रारने उत्तर दिले आहे.
नुकतंच ''द कपिल शर्मा शो''मध्ये तीन प्रसिद्ध शेफ्सने हजेरी लावली होती. यामध्ये सुप्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार देखील उपस्थित होते. यावेळी कपिल शर्माने जेवताना कधी प्यावे यासंदर्भात प्रश्न विचारला. तेव्हा शेफ रणवीर ब्रारने आयुर्वेदात याबाबत काय सांगितले आहे हे स्पष्ट केले. त्यांनी जेवणाच्या आधी, जेवणासोबत आणि जेवल्यानंतर पाणी पिण्यासंदर्भात माहिती दिली आहे.
जेवणाच्या अगोदरचे पाणी म्हणजे अमृत
जेवणाअगोदर पाणी पिणे म्हणजे अमृत समान आहे असे आयुर्वेदात म्हटले आहे. जेवणा अगोदर पाणी पिण्याचा फायदा हा शरीराला होतो. पाणी प्यायल्याने पोट थोडे भरते, यामुळे अन्नाचे कमी सेवन होते. पोटाचे अदृश्य ४ सामान भाग करावे. त्यातील एका भागात पाणी, दुसऱ्या भागात हवा आणि उरलेल्या २ भागात जेवण अशी विभागणी करा. ज्यामुळे आपल्या पोटाला त्रास सहन करावे लागणार नाही. जेवणाच्या अगोदर पाणी पिणे उत्तम ठरेल, त्या पाण्याला अमृतसमान असे म्हटले गेले आहे.
जेवणासोबतचे पाणी म्हणजे आनंद
आयुर्वेदानुसार जेवणासोबत पाणी पिणे योग्य मानले आहे. जेवणासोबत पाणी पिणे म्हणजे आनंदासमान आहे. जेवताना थोडे थोडे पाणी प्यावे. ही प्रक्रिया पचनासाठी उत्तम मानली गेली आहे. जर आपली पचनक्रिया हळू असेल तर, जेवताना एक - एक पाण्याचे घोट पीत जेवण करा. याने आपल्याला नक्कीच फायदा होईल. इतर पेयांपेक्षा जेवताना नेहमी पाण्याला प्राधान्य द्या. साखरेयुक्त पेय पिऊ नका.
जेवणानंतरचे पाणी म्हणजे विषसमान
जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. आयुर्वेदात या प्रक्रियेला विषसमान मानले आहे. कारण अन्नाचे सेवन केल्यानंतर पचनक्रियेला सुरुवात होते. पचनक्रिया सुरु झाल्यानंतर शरीरात एक भट्टी सुरु होते. अशावेळी पाणी प्यायल्याने ती भट्टी थंड पडते. ज्यामुळे पचनक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. अशा परिस्थितीत पचनक्रिया नीट होत नाही. त्यामुळे जेवानंतर तात्काळ पाणी पिऊ नये.
जेवणानंतर १ तासाने पाणी पिणे म्हणजे ताकद
अनेकांना जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवयी असते. ही सवय पचनसंस्थेसाठी घातक मानले गेले आहे. आपला सकस आहार झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. १ किंवा अर्ध्या तासानंतर पाणी प्या. याने शरीराला ताकद आणि उर्जा मिळते. पचनाची प्रक्रिया व्यवस्थित झाल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीराला नक्कीच याचा फायदा होतो.