Join us   

तहान लागलेली नसताना भरमसाठ पाणी पिण्याची हौस, आजारांना आमंत्रण! कशासाठी प्यायचं गरज नसताना पाणी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2024 8:00 AM

पाणी भरपूर प्या, भरपूर प्या म्हणजे नेमकं किती प्यायचं?

ठळक मुद्दे पाण्याची ही गरज व्यक्तीची प्रकृती, ऋतु, कोणत्या प्रदेशात राहतो तेथील वातावरण, असलेले आजार यावरुन ठरत असते.

घोटभर पाणी आणि त्याची भयंकर चर्चा. पाणी कधी प्यावं, किती प्यावं, सकाळी उठल्याउठल्या प्यावं का, झोपण्यापूर्वी प्यावं का, जेवताना प्यावं का, जेवण झाल्यावर की आधी प्यावं, कोमट की गार, उभं राहून की बसून प्यावं? हजार प्रश्न. एरव्ही हे प्रश्न आपल्याला पडलेही नसते. पण आता व्हॉट्स ॲप आणि युट्यूब व्हिडिओवर इतकी माहिती मिळते की नक्की खरं काय आणि करायचं काय हेच कळत नाही. आयुर्वेदतज्ज्ञ निवेदिता पाटील यासंदर्भात नक्की करावं काय ते सांगतात..

पाणी किती आणि केव्हा?

१. सर्वात सोपा नियम म्हणजे ‘तहान लागली की पाणी प्यावं आणि तहान भागेल इतकंच पाणी प्यावं. उगीचच पाणी पिऊ नये.  २. दिवसभरात ५ बाटल्या, उठल्यावर २ तांबे, जेवणानंतर २ तांबे असे पाण्याचे नियम करुन पाणी पिऊ नका. आपलं शरीर म्हणजे काही पाण्याची बादली नाही. ३. नको असताना प्यालेलं पाणी बाहेर काढण्यासाठी मूत्राशयावर अकारण जास्तीचा ताण येतो. ४. अन्नपचनासाठी आणि इतर कार्यासाठी शरीराला पाण्याची गरज असते. पाण्याची ही गरज व्यक्तीची प्रकृती, ऋतु, कोणत्या प्रदेशात राहतो तेथील वातावरण, असलेले आजार यावरुन ठरत असते.

(Image : google)

५.  उन्हाळ्यात घामाद्वारे पाण्याचं उत्सजर्न हे म्हणून इतर ऋतूंपेक्षा पाणी जास्त लागतं. पण जर दिवसभर एसीमध्ये काम करत असाल तर ही गरज कमी होईल. त्यामुळे तहान कधी लागते याकडे लक्ष द्या. घाम कमी येतो तिथे कमी पाणी प्यालं तरी चालतं, पण सूत्र तेच, शरीर सांगतं तेव्हा पाणी प्या. ६. सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपतांना पाणी पिऊ नये. सतत सर्दी होणं, नाक चोंदणं, दमा, स्थूलता, रक्तदाब वृद्धी या सारख्या आजारांचं हे कारण ठरतं. वाटलं तर कोमट घोटभरच पाणी प्या. ७. जेवतांना जेवणाच्यामध्ये थोडं थोडं पाणी प्यावं. जेवणानंतर भरपूर पाणी पिण्यानं मानेच्यावरील भागांतील अवयवांचे आजार होतात. ८. आपल्याला एखादा आजार असेल तर डॉक्टरांना विचारुन पाणी प्यावं. अकारण स्वत:वर प्रयोग करु नयेत.

टॅग्स : आरोग्यपाणीअन्न