Join us   

रात्री तुम्ही कोणत्या कुशीवर झोपता, पालथे झोपता की पाठीवर? झोपण्याची कोणती स्थिती योग्य, कोणती चूक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 3:12 PM

रात्री कसे झोपलात येईल गाढ झोप? उत्तम आरोग्यासाठी झोपताना काळजी घ्यायला हवी

ठळक मुद्दे कोणत्या पोझिशनमध्ये झोपलेले आरोग्यासाठी चांगले आणि कोणत्या पोझिशनमुळे आरोग्यावर काय परिणाम होतात याविषयीरात्रीची पुरेशी झोप झाली नाही की दिवसा ऑफीसचे काम करताना किंवा कोणत्याही वेळेला पेंग यायला लागते.

रात्रीची झोप न येणं, मग उशीरा झोप लागणं आणि सकाळी जाग न येणे अशा समस्या सध्या सर्वच वयोगटात दिसून येतात. वेगवेगळे ताण, सोशल मीडियाचा अतिवापर, शारीरिक तक्रारी यांमुळे उद्भवणारी झोपेची समस्या महिलांमध्येही पाहायला मिळते. दिवसभर घरची, बाहेरची, ऑफीसची कामं करुन कितीही थकलो तरी काही केल्या लवकर झोप लागत नाही. रात्रीची पुरेशी झोप झाली नाही की दिवसा ऑफीसचे काम करताना किंवा कोणत्याही वेळेला पेंग यायला लागते. पूर्ण झोप झाली नाही की मग पुढचा सगळा दिवसच आळसावलेला जातो. इतकेच नाही तर झोप अपुरी झाली तर पचनाच्या तक्रारी, महिलांमध्ये पाळीच्या तक्रारी, हृदयाशी निगडीत तक्रारीही उद्भवतात. एकतर आपण पालथे झोपतो, पाठीवर झोपतो, डाव्या कुशीवर किंवा उजव्या कुशीवर झोपतो. यापैकी कोणत्या पोझिशनमध्ये झोपलेले आरोग्यासाठी चांगले आणि कोणत्या पोझिशनमुळे आरोग्यावर काय परिणाम होतात याविषयी प्रसिद्ध योगतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र सांगतात ...

 पोटावर झोपणे - पालथे झोपणारे लोक डिप्रेसिव्ह प्रकारात येतात. त्यांना जगाला सामोरे जाऊन आव्हानांचा सामना करायचा नसतो असे योगामध्ये म्हटले जाते. मकरासन म्हणजे पोटावर झोपणे ही पोझिशन रिलॅक्स होण्यासाठी चांगली असली तरीही हा तुमच्यासाठी झोपेचा सगळ्यात शेवटचा पर्याय असायला हवा. १० मिनिटांसाठी असे झोपणे ठिक आहे. पण रात्रीच्या झोपेसाठी ही पोझ योग्य नाही. यामुळे तुमच्या मणक्यावर मानेवर ताण येऊ शकतो. या पोझिशनमध्ये झोपल्यामुळे तुम्ही श्वास घेताना तुमची फुफ्फुसे पूर्णपणे फुलू शकत नाहीत. त्यामुळे रात्रभर झोप झाली तरी तुम्हाला सकाळी उठल्यावर आळसावल्यासारखे वाटते आणि हा आळस दिवसभर राहतो. तसेच पचनक्रियेवरही अशाप्रकारे झोपण्याचा विपरित परिणाम होतो. 

पाठीवर झोपणे - जे पाठीवर झोपतात ते भरपूर घोरतात. तसेच अनेकदा या लोकांचे पोटही वाढलेले असते. असे लोक हेल्दी नसतात. पाठीवर झोपण्याचे फायदे आहेत त्याप्रमाणे काही तोटेही आहेत. गर्भवती स्त्रिया, लठ्ठ असलेल्या महिला आणि वयस्कर महिलांनी पाठीवर झोपणे टाळायला हवे. ज्यांना अॅसिडीटी आणि वात यांसारखे त्रास आहेत त्यांनी कधीही पाठीवर झोपू नये. मात्र ज्यांना सर्व्हायकल स्पॉंडीलायसिस, खांदेदुखीसारखे त्रास असतील त्यांनी नक्की पाठीवर झोपायला हवे. यासाठी त्यांनी झोपताना उशीचा योग्य पद्धतीने वापर करायला हवा. पण इतरांनी नियमितपणे रात्रभरासाठी पाठीवर झोपणे योग्य नाही. फारतर अर्धा तासासाठी पाठीवर झोपणे ठीक आहे. 

एका कुशीवर झोपणे - एका कुशीवर झोपणे ही झोपण्यासाठी सर्वात उत्तम पोझिशन आहे. यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. डाव्या कुशीवरा झोपणारे लोक काळजीवाहू प्रकारातले असतात. त्यांना संसाराच्या चिंता असतात. तसेच या लोकांची श्वसनक्रिया, पचनक्रिया तसेच रक्तप्रवाह सुरळीत असतो. उजव्या कुशीवर झोपणारे लोक हे योगी मानले जातात. त्यांना कोणत्याच प्रकारची काळजी नसते, ते नेहमी एकदम रिलॅक्स असतात. 

आयुर्वेदानुसार डाव्या कुशीवर झोपणे पचनाच्या तक्रारींवरील उत्तम उपाय आहे. घोरण्याचा त्रास असेल तर त्या व्यक्तीला एका कुशीवर केल्यामुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते. ज्यांना कफ, सर्दी, सायनस या प्रकारचे त्रास आहेत त्यांनी डाव्या कुशीवर झोपायला हवे. गर्भवती स्त्रियांसाठीही एका अंगावर किंवा डाव्या कुशीवर झोपणे उत्तम आहे. त्यामुळे गर्भाला रक्तपुरवठा, अन्न आणि पाण्याचा पुरवठा चांगल्या पद्धतीने होतो. पाठदुखी थांबण्यासाठीही एका अंगावर झोपणे उत्तम. उजव्या कुशीवर झोपल्यामुळेही या सर्व तक्रारी दूर होण्यास मदत होते. मात्र जेवण झाल्यावर उजव्या कुशीवर अजिबात झोपू नये. त्यामुळे पचनक्रियेत अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सुरुवातीला डाव्या कुशीवर आणि नंतर उजव्या कुशीवर झोपणे चांगले. तुमचे पोट रिकामे असते तेव्हा तुम्ही काही वेळासाठी उजव्या कुशीवर झोपलात तर तुम्ही कमी वेळात खूप जास्त रिलॅक्स होता. तुमची झोप शांत आणि चांगली होत असेल तर शारीरिक तक्रारी तर दूर होतातच पण तुमचा स्वत:वर ताबा राहण्यासही मदत होते. यामुळे तुम्ही रागावर नियंत्रण ठेऊ शकता तसेच तुमचे डोके शांत राहिल्याने तुमची अनेक कामे सुरळीत होतात. त्यामुळे झोपताना तुम्ही दोन्ही कुशींवर झोपणे गाढ झोपेसाठी अतिशय उत्तम असते.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल