Join us   

डायबिटीस आणि शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता आहार योग्य? ऋजुता दिवेकर सांगतात सोपे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2021 3:50 PM

मधुमेह हा आजार म्हणजे आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. पण मधुमेह असला तरी सुरक्षित आणि आनंदी जगणं सहज शक्य आहे. काही पथ्यं पाळल्यास हा आजार नियंत्रित राहातो. प्रसिध्द आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी मधुमेह काबूत ठेवण्यासाठी आहाराच्याबाबत काय काळजी घ्यायला हवी याबाबत सोपे नियम सांगितलेले आहेत. 

ठळक मुद्दे मधुमेहात सकाळची सुरुवात खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे काय आणि कधी खावं हे खूप महत्त्वाचं आहे. दुपारच्या जेवणात दह्याचं ताजं ताक करुन प्यायला हवं. मधुमेह असणर्‍यांना मधून मधून भूक लागते. अशा वेळेस आरोग्यास घातक पदार्थ खाण्यापेक्षा शेंगदाणे खावेत.

मधुमेह या आजारात अनुवांशिकता आहे तसेच बदलती जीवनशैली ही देखील कारणीभूत आहे. अजूनही मधुमेहाकडे खूप गंभीरतेनं पाहिलं जातं असं नाही. पण मधुमेह एकदा झाला की तो पूर्ण बरा होत नाही हे सर्वांनाच माहित आहे. पण तो नियंत्रित करुन मधुमेहामुळे इतर गंभीर समस्या उदभवण्यापासून आपण स्वत:चं संरक्षण करु शकतो. मधुमेह हा आजार चयापचय क्रिया बिघडल्यानं होतो. यामुळे इंन्शुलिनची निर्मिती कमी होते किंवा अगदीच होत नाही. त्यामुळे रक्तातील साखर वाढते. मधुमेह हा आजार म्हणजे आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. पण मधुमेह असला तरी सुरक्षित आणि आनंदी जगणं सहज शक्य आहे. काही पथ्यं पाळल्यास हा आजार नियंत्रित राहातो. प्रसिध्द आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी मधुमेह काबूत ठेवण्यासाठी आहाराच्याबाबत काय काळजी घ्यायला हवी याबाबत मार्गदर्शन केलं आहे.

 छायाचित्र:- गुगल 

ऋजुता दिवेकर म्हणतात की..

1. मधुमेहात सकाळची सुरुवात खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे काय आणि कधी खावं हे खूप महत्त्वाचं आहे. सकाळी ताजं हंगामी फळ आणि त्यासोबत बदाम खायला हवेत. कारण रात्री जेवणानंतर ते उठेपर्यंत मोठा काळ उलटून गेलेला असतो. त्यामुळे सकाळी वेळेवर आणि तेही आरोग्यदायी खाणं खूप महत्त्वाचं ठरतं. जर सकाळी वेळेवर खाल्लं नाही तर रक्तातील साखर वाढते. तसेच अनेकजण उठल्या उठल्या चहा कॉफी घेतात. मधुमेहींसाठी ही सर्वात धोकादायक सुरुवात आहे. ती टाळायला हवी.

2. मधुमेहात आहारासोबत औषधंही महत्त्वाची असतात. पण औषधांमुळे बध्दकोष्ठतेसारखी पचन समस्या निर्माण होते. ती चुकीच्या वेळी आहार घेतल्याने ही समस्या वाढते. तसं होवू नये म्हणून जेवणाच्या वेळेस जेवण करणं खूप गरजेचं असतं. दुपारी अकरा ते एकच्या दरम्यान जेवण करायला हवं. दुपारच्या जेवणात दह्याचं ताजं ताक करुन प्यायला हवं.

3. मधुमेह असणर्‍यांना मधून मधून भूक लागते. अशा वेळेस आरोग्यास घातक पदार्थ खाण्यापेक्षा शेंगदाणे खावेत. शेंगदाण्यात अमिनो अँसिडस मोठ्या प्रमाणात असतात. तसेच शेंगदाण्यात फायबरचं प्रमाणही जास्त असतं. शेंगदाणे खाल्ल्यानं पोट बराच काळ भरलेलं राहातं. सारखी भूक लागत नाही. त्यामुळे संध्याकाळी स्नॅक्स म्हणून शेंगदाणे खावेत.

 छायाचित्र:- गुगल 

4. मधुमेह आहे म्हणून साखर टाळून पदार्थात गोडवा आणण्यासाठी कृत्रिम साखर किंवा स्टेव्हिया ( गोड गोळ्या) यांचा समावेश केला जातो. पण याच्या अतिसेवनामुळे शरीरातील पेशींना धोका निर्माण होतो. यामुळे किडनी, हदय आणि नसांसंबंधीच्या समस्या उद्भवण्याचा धोका असतो. त्यामुळे कृत्रिम साखर किंवा स्टेव्हियाच्या अतिसेवनापासून वाचण्यासाठी चहा कॉफीत एखादा चमचा साखर घालणं जास्त सुरक्षित आहे.

5 इन्शुलिन निर्मितीला चालना देण्यासाठी आहार-औषधं यासोबतच व्यायमही महत्त्वाचा आहे. रोज व्यायाम करणं गरजेचं असुण आठवड्यातून किमान दोन वेळा वेट ट्रेनिंग ( वजन उचलण्याच्याशी निगडित व्यायाम) करायला हवा.