प्रत्येक सिझनमध्ये कोणता आहार घ्यायचा याचे काही नियम ठरलेले असतात. तसा आहार घेतला तर तो ऋतू आपल्याला बाधत नाही आणि तब्येत चांगली राहण्यास मदत होते. थंडी म्हटलं की फळं-भाज्या यांची सरबराई. थंडीचा काळ म्हणजे वर्षभरासाठी आरोग्य उत्तम ठेवण्याचा काळ. त्यामुळे या काळात आहार आणि व्यायाम याकडे विशेष लक्ष दिले जाते. या काळात खाण्याची चंगळ असली तरी नेमकं काय खायचं याचीही माहिती असायला हवी. एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये नेमकं काही खाल्ल की त्यामुळे तब्येत चांगली राहते असं आपण नेहमी ऐकतो, त्याचप्रमाणे थंडीच्या दिवसांत कोणती फळं खाल्लेली चांगली याविषयी आपल्याला माहिती असेलच असे नाही. उन्हाळ्यात पाणीदार फळं आवर्जून खाल्ली जातात, त्याचप्रमाणे पावसाळ्यात कमीत कमी फळं खावीत असं म्हणतात. मात्र थंडीच्या दिवसांत कोणती फळं खावीत याविषयी जाणून घेऊया (Which Fruits to Eat in Winter Season Diet Tips).
१. संत्री
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार थंडीच्या दिवसांत व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात घेतलेले चांगले. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्याने थंडीत संत्री आवर्जून खायला हवीत. व्हिटॅमिन सीमुळे सर्दीपासून सुटका होण्यास मदत होते. तसेच संत्र्यामध्ये फोलेट आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यास त्याची मदत होते.
२. आवळा
आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंटस जास्त प्रमाणात असल्याने शरीरासाठी आवळा अतिशय फायदेशीर असतो. डोळे, त्वचा, केस यांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आवळ्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. पोटाच्या तक्रारींवरही आवळा फायदेशीर असतो. आवळा सरबत, आवळ्याचं लोणचं, आवळा कँडी अशा वेगवेगळ्या स्वरुपात आपण आवळा खाऊ शकतो.
३. काळी द्राक्षे
थंडीच्या दिवसांत बाजारात द्राक्षं मोठ्या प्रमाणात मिळतात. यातही काळी द्राक्षं आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्याने त्याचा शरीराला फायदा होतो. रोज नाही पण आठवड्यातून एकदा जरी काळी द्राक्षं खाल्ली तरी त्याचा प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी चांगला फायदा होतो.