उन्हाळा म्हटला की अंगाची लाहीलाही आणि सतत घशाला पडणारी कोरड. डोक्यावर तळपतं ऊन असलं की खायला काही नाही मिळालं तरी चालतं पण प्यायला थंडगार पाणी (Summer Special ) तर हवंच. पाण्याला पर्याय म्हणून सरबत, मिल्कशेक, उसाचा रस, ताक असं सगळं असलं तरी पाण्याची जागा यातले कोणतेच पदार्थ घेऊ शकत नाहीत. पाणी प्यायल्यावर जी तृप्ती मिळते ती शब्दात न सांगता येण्याजोगी असते. उन्हाळा जवळ आला की आपल्या सगळ्यांची माठ आणण्याची लगबग सुरू होते. फ्रिजमधल्या गार पाण्यानी तात्पुरते बरे वाटत असले तरी माठातल्या पाण्याची सर कशालाच येणार नाही. मातीमुळे मिळणारा नैसर्गिक थंडावा तहान तर शमवतोच पण मनालाही तृप्त करतो. आता माठ आणताना आपल्या मनात अनेक प्रश्न असतात. नळ असलेला माठ (Math) गळणार तर नाही ना, कशाप्रकारचा माठ जास्त दिवस टिकायला चांगला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काळ्या मातीचा माठ चांगला की लाल मातीचा? की नव्याने बाजारात आलेले पांढऱ्या रंगाचे डिझायनर माठ पाणी गार होण्यासाठी जास्त चांगले? याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न...
१. साधारणपणे पूर्वीपासून आपल्याकडे काळ्या मातीचे माठ प्रामुख्याने वापरले जातात. रस्त्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रांजणांचा रंगही काळाच असतो. या काळ्या मातीत पाणी जास्त चांगले गार होत असल्याचे दिव्य मराठीने केलेल्या एका अभ्यासात दिसून आले. ३६ अंश सेल्सियस तापमानाला काळ्या माठात ठेवलेले पाणी ४ तासात १७ अंश सेल्सियस इतके गार झाले. माठातून पाणी जितके जास्त पाझरेल तितके त्या माठात पाणी गार होण्याचे प्रमाण जास्त असते. काळी माती म्हणजे काळ्या खडकापासून तयार केली जाणारी आपल्याला सामान्यपणे दिसणारी आणि सगळीकडे उपलब्ध असणारी माती असते. ही माती नैसर्गिकरित्या चांगली असल्याने यामध्ये पाणी जास्त गार होते. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात माठ खरेदी करायचा विचार करत असाल तर जुनं ते सोनं म्हणत काळया मातीच्या माठाचा प्रामुख्याने विचार करा.
२. पूर्वी फक्त काळ्या मातीचे गोल हंड्याच्या आकारातील माठ उपलब्ध होत असत. गेल्या काही वर्षांपासून मात्र लाल रंगाच्या माठ तयार करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते. यातही वेगवेगळ्या घाटाचे, डिझाईन असलेले, झाकण असलेले, नळ असलेले असे बरेच माठ दिसतात. या माठांची किंमत काळ्या माठांपेक्षा तुलनेने थोडी जास्त असते. लाल माती ही साधारणपणे कोकण भागात मिळते. तसेच विटा ज्या मातीपासून तयार केल्या जातात ती लाल माती माठासाठी वापरली जाते. ३६ अंश सेल्सियस तापमानाला लाल माठात ठेवलेले पाणी ४ तासात १९ अंश सेल्सियस इतके गार झाले. त्यामुळे तुम्हाला साधारण गार पाणी आवडत असेल तर तुम्ही लाल माठाचाही आवर्जून विचार करु शकता.
३. गेल्या काही वर्षांपासून डिझाइन असलेले पांढऱ्या मातीचे माठ बाजारात दाखल झालेले दिसतात. हे माठ दिसायला आकर्षक असले तरी त्यात पाणी म्हणावे तितके गार होत नाही. या माठांनाच चिनी मातीचे माठ असेही म्हणतात. या मातीमध्ये काही प्रमाणात सिमेंट मिक्स केलेले असण्याची शक्यता असल्याने ते म्हणावे तितके गार होत नाही. नैसर्गिक मातीच्या माठात पाणी जितके आणि जसे गार होते तसे या माठात होत नाही. ३६ अंश सेल्सियस तापमानाला लाल माठात ठेवलेले पाणी ४ तासात १७ अंश सेल्सियस इतके गार झाले. त्यामुळे हा माठ म्हणावा तितका फायदेशीर नसल्याचे सिद्ध झाले आहे. हे माठ मध्यप्रदेश किंवा इतर राज्यांतून येत असल्याने त्याची किंमत इतर माठांपेक्षा जास्त आहे.