व्यायामाचा सर्वात सोपा प्रकार म्हणजे चालणं आणि बहुतेक लोक सकाळी चालणं पसंत करतात. शारीरिक तंदुरुस्तीसाठी हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. चालताना वेळेसारख्या काही घटकांचा विचार केल्यास या व्यायामाचा जास्त फायदा होऊ शकतो.
चालताना काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे, चालण्याची योग्य वेळ ठरवण्यासाठी झोपेचं वेळापत्रक, चालण्याचा उद्देश, फिटनेसचं टार्गेट, चालण्याची जागा आणि हवामानाची परिस्थिती यासारख्या गोष्टींचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे.
सूर्योदयापूर्वी चालणं फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी चांगलं
सूर्योदयापूर्वी चालल्यामुळे शांत रस्ता, प्रसन्नता आणि पहाटेच्या वेळेचा ताजेपणा अनुभवता येतो. जर तुम्ही एकटेपणाचा आनंद घेत असाल आणि विचलित न होता निसर्गाशी संपर्क साधू इच्छित असाल तर ही वेळ आदर्श आहे. सूर्योदयापूर्वी चालणं फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. हे थोडं थंड तापमान आरामदायी चालण्यासाठी योग्य आहे.
६.३० ते ८ या दरम्यान वॉक केल्याने शांतता
सकाळी ६.३० ते ८ या दरम्यान मॉर्निंग वॉक केल्याने शांतता आणि व्यावहारिकता यांच्यात समतोल साधता येतो. या काळात चालल्यामुळे शरीर ताज्या सूर्यकिरणांच्या संपर्कात येतं. ज्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी देखील मिळतं. जे लोक सकाळच्या शिफ्टमध्ये काम करतात त्यांच्यासाठी मात्र ही चालण्याची वेळ थोडी समस्या ठरू शकते.
जे लोक नंतर उठतात किंवा त्याचं वेळापत्रक थोडं फेक्सिबल असतं त्यांच्यासाठी सकाळी ८ ते १० या वेळेत चालणं फायदेशीर आहे. तुम्हाला घाई न करता सकाळच्या व्यायामाचा आनंद घेता येऊ शकतो.
न्याहारीनंतर चालणं पचनास करतं मदत
या कालावधीत चालणं अशा व्यक्तींसाठी योग्य आहे जे पहाटेच्या थंडीबद्दल जास्त संवेदनशील असतात. न्याहारीनंतर चालणं पचनास मदत करतं, विशेषत: जेव्हा आपण जास्त जेवण घेतो तेव्हा. ज्यांना व्हिटॅमिन डीची गरज असते त्यांच्यासाठी सकाळी उशीरा चालणं फायदेशीर ठरू शकतं.
चालण्यासाठी सकाळी स्वतःला कसं तयार करावं?
चालण्याची गुरुकिल्ली म्हणजे ती गोष्ट शांत मनाने आणि स्वेच्छेने करणं. स्वतःला ते मुद्दाम करायला लावू नका. त्याऐवजी, वेळापत्रक तयार करा आणि त्याचं अनुसरण करा. २०-३० मिनिटं लवकर उठा आणि चालायला जाण्यापूर्वी थोडं वॉर्मअप व्हा. ५-१० मिनिटं स्ट्रेचिंग केल्याने शरीरावर ताण न पडता आरामात चालता येतं.